शाैर्य चक्र विजेत्याच्या घरावर दहशतवादी हल्ला; एका दहशतवाद्याचा खात्मा, शाेध माेहीम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 08:06 AM2024-07-23T08:06:07+5:302024-07-23T08:06:26+5:30
दाेन दहशतवाद्यांना ठार मारणाऱ्या पुरुषाेत्तम कुमार यांना शाैर्य चक्राने सन्मानित करण्यात आले हाेते. ते राजाैरी येथे गुंधा येथील मूळचे रहिवासी आहेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
जम्मू : दहशतवाद्यांनी जम्मू परिक्षेत्रातील राजाैरी जिल्ह्यात शाैर्य चक्र पुरस्काराने सन्मानित केलेले पुरुषाेत्तम कुमार यांच्या घरावर हल्ला केला. हल्ल्याला दिलेल्या प्रत्युत्तरात एका दहशतवाद्याला ठार मारण्यात आले आहे. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
दाेन दहशतवाद्यांना ठार मारणाऱ्या पुरुषाेत्तम कुमार यांना शाैर्य चक्राने सन्मानित करण्यात आले हाेते. ते राजाैरी येथे गुंधा येथील मूळचे रहिवासी आहेत. ते व्हिलेज डिफेन्स गार्डदेखील आहेत. हल्ल्यानंतर झालेल्या चकमकीत त्यांचे काका आणि एक जवान जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दहशतवाद्यांनी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घरावर हल्ला केला. या हल्ल्याची पूर्वकल्पना लष्कराला हाेती. त्यामुळे त्या भागात सुरक्षा दल तैनात हाेते. हल्ला हाेताच प्रत्युत्तर देण्यात आले. या भागात आणखी दहशतवादी लपले असल्याचा संशय असून लष्कराने शाेध माेहीम सुरू केली आहे. जम्मू परिक्षेत्रात गेल्या काही दिवसांमधील हा १४ वा हल्ला आहे. या घटनांमध्ये २ अधिकाऱ्यांसह १० जवान शहीद झाले असून ९ भाविकांचाही मृत्यू झाला आहे. तर, ५ दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे.
‘तो’ व्हिडीओ शेअर केल्यास कारवाई
पोलिसांनी जैश-ए-मोहम्मदने जारी केलेल्या प्रोपगंडा व्हिडीओबाबत अलर्ट जारी केला आहे. व्हिडीओ शेअर केल्यास यूएपीएअंतर्गत कारवाई केली जाईल. जैश-ए-मोहम्मदने बॉलिवूड चित्रपट ‘फँटम’च्या पोस्टरसह पाच मिनिटांचा ५५ सेकंदांचा व्हिडीओ जारी केला आहे.
नवीन तुकड्यांना लक्ष्य
सैनिकांवर हल्ले करण्यासाठी दहशतवादी नवनवीन रणनीती अवलंबत असल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात दहशतवादी नेटवर्क पसरविण्यास दहशतवादी यशस्वी झाले आहेत.
ते लष्कराच्या नव्याने तैनात करण्यात आलेल्या तुकड्यांना लक्ष्य करत आहेत. दहशतवादी हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांनी ही रणनीती अवलंबली आहे.