टेरर फंडिंग; NIA चे श्रीनगरमधील 11 ठिकाणांवर तर दिल्लीतील 5 ठिकाणांवर छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2017 11:27 AM2017-09-06T11:27:06+5:302017-09-06T11:55:44+5:30
पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांकडून होणाऱ्या आर्थिक मदत (टेरर फंडिंग) प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेची छापेमारी अजूनही सुरूच आहे.
श्रीनगर, दि. 6- पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांकडून होणाऱ्या आर्थिक मदत (टेरर फंडिंग) प्रकरणीराष्ट्रीय तपास यंत्रणेची छापेमारी अजूनही सुरूच आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेनं बुधवारी सकाळी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील 11 ठिकाणी तर नवी दिल्लीतील पाच ठिकाणांवर छापेमारी केली आहे. काश्मीर खोऱ्यात दहशतवादी संघटनांकडून होणाऱ्या आर्थिक मदत प्रकरणी राष्ट्रीय तपाय यंत्रणेने ही कारवाई केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने मंगळवारी दोन जणांना अटक केली. यामध्ये एका फ्रिलायन्सर फोटो जर्नलिस्टचाही सहभाग आहे. दगडफेक आणि सुरक्षा रक्षकांविरोधात सोशल मीडियावर लोकांचं समर्थन मिळविण्याचं काम हे दोघे करत होते, असा आरोप ठेवण्यात आला आहे. या दोघांना अटक केल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून ही छापेमारी करण्यात आली आहे. याच दरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी काही संशयित ठिकाणांची तपासणी केली.
जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक केल्याप्रकरणी कामरान युसूफ आणि जाविद अहमद भट या दोघांना पुलवामा आणि कुलगाम जिल्ह्यातून अटक करण्यात आल्याचा दावा एनआयएने केला आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या दोघांचाही काश्मीरमधील दगडफेकीच्या अनेक घटनांमध्ये सहभाग असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. दगडफेकीच्या घटनांची एनआयएकडून चौकशी सुरू आहे. दगडफेकीच्या घटनांशी संबंधित तरुणांची घरं आणि नियंत्रण रेषेजवळील व्यापाऱ्यांची घरं आणि व्यावसायिक कार्यालयांवर छापेमारी करण्यात येत आहे, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.
NIA raids at 11 locations in Srinagar and 5 locations in Delhi, in J&K terror funding case; Visuals from Delhi's Lajpat Nagar pic.twitter.com/DZQ9W1D8J3
— ANI (@ANI) September 6, 2017
राष्ट्रीय तपास यंत्रणेने बुधवारी केलेली ही कारवाई 30 मे रोजी दाखल झालेल्या तक्रारीचा भाग आहे. यामध्ये पाकिस्तानमधील जमात-उद-दावा आणि लष्कर-ए-तोयबाचा नेता हाफिज सईद यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते.
याआधी काश्मीर खो-यामध्ये हिंसक कारवाया घडवण्यासाठी तसंच दहशतावाद पसरवण्यासाठी कथित स्वरुपात पाकिस्तानकडून आर्थिक रसद घेतल्याच्या आरोपावरुन सात काश्मिरी फुटिरतावादी नेत्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) अटक केली होती. नईम खान, फारूक अहमद डार उर्फ बिट्टा कराटे, अल्ताफ अहमद शाह, शाहिद-उल-इस्लाम, अयाज अकबर, पीर सैफुल्ला व राजा मेहराजुद्दीन कलवल यांचा समावेश होता.
राष्ट्रीय तपास यंत्रणांनी श्रीनगर, बारामुल्ला आणि हंदवाड्यातील 12 ठिकाणी मारले होते छापे
पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांकडून होणाऱ्या आर्थिक मदत (टेरर फंडिंग) प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर, बारामुल्ला आणि हंदवाड्यातील 12 ठिकाणी छापे मारले होते. बारामुल्ला जिल्ह्यातील कुंजर परिसरात कट्टरवाद्यांच्या हुर्रियत कॉन्फरन्स संघटनेशी संबंधित असलेल्या नातेवाईकांच्या ठिकाणांवरही छापेमारी करण्यात आली. टेरर फंडिंग प्रकरणात अनेक फुटीरतावादी नेत्यांची चौकशी सुरू असतानाच राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (एनआयए) कारवाईचा फास आणखी आवळला. श्रीनगरमधील एका व्यावसायिकाशी संबंधित असलेल्या दोन ठिकाणांवरही एनआयएनं कारवाई केली आहे.
एका टीव्ही चॅनेलवर प्रसारित करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये टेरर फडिंगची बाब स्वीकारल्यानंतर हुर्रियतनं नईम खानवर निलंबनाची कारवाई केली होती. या स्टिंग ऑपरेशनमध्ये नईम खाननं म्हटले होते की, काश्मीर खो-यात हिंसक कारवाया घडवण्यासाठी पाकिस्तानकडून आर्थिक रसद घेतली जाते. या गौप्यस्फोटानंतर एनआयएनं मे 2017मध्ये याप्रकरणी काही जणांची चौकशी करण्यास सुरुवात केली.
शिवाय, एनआयएनं श्रीनगर, जम्मू, दिल्ली तसेच हरियाणामध्ये छापा टाकला होता. पाकिस्तानकडून पुरवण्यात येणारी आर्थिक रसद स्वीकारणारी व्यक्ती, मध्यस्थी करणारी व्यक्ती तसंच मूळ व्यक्तीसंबंधी ठोस पुरावे हस्तगत केले होते.