दहशतवादाला बढावा दिलेला नाही, कोणत्याही चौकशीला तयार - झाकीर नाईक
By admin | Published: July 7, 2016 12:02 PM2016-07-07T12:02:16+5:302016-07-07T12:06:42+5:30
बांगलादेशातील ढाका शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तपासयंत्रणांच्या रडारवर असलेल्या डॉ. झाकीर नाईक यांनी आपण दहशतवाला खतपाणी घातलं नसून कोणतंही चुकीचं काम केलं नसल्याचा दावा केला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 07 - बांगलादेशातील ढाका शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तपासयंत्रणांच्या रडारवर असलेल्या डॉ. झाकीर नाईक यांनी आपण दहशतवाला खतपाणी घातलं नसून कोणतंही चुकीचं काम केलं नसल्याचा दावा केला आहे. इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक व इस्लामचे अभ्यासक तसेच वक्ते डॉ. झाकीर नाईक यांनी आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं आहे.
बांगलादेशातील ढाका शहरात गेल्या आठवड्यात २० विदेशी नागरिकांच्या झालेल्या निर्घृण हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक व इस्लामचे अभ्यासक तसेच वक्ते डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणांची तपासणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करीत आहे. आर्टिसन बेकरीतील या हत्याकांडात सक्रिय सहभाग असलेल्या पाच बांगलादेशी अतिरेक्यांपैकी एकाने मुंबईस्थित नाईक यांच्या प्रवचनांचे अनुसरण केले होते, असे समोर आल्यानंतर एनआयएने त्यांची भाषणे, लिखाण तसेच त्यांच्या संस्थेचे कार्य यांची तपासणी सुरू केली आहे.
'मी दहशतवादाला बढावा देतो असं म्हणणं तथ्यहीन आहे. कोणत्याही तपास यंत्रणेने मी दहशतवादाला बढावा देतो असं म्हटलेलं नाही. गृहमंत्रालय माझ्या सर्व भाषणांची तपासणी करु शकतं', असं झाकीर नाईक यांनी एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
'माझे अनेक अनुयायी आहेत, अनेक जण माझ्यापासून प्रेरित होत असतात. लोक माझ्यापासून प्रेरित होत असतील पण मी त्यांनी व्यक्तीश: ओळखत नाही. प्रसारमाध्यमं आणि राजकारणी माझी प्रतिमा मलीन करत आहेत. काही लोक माझा फोटो वापरुन माझी बदनामी करत आहेत. माझ्याविरोधातील चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार आहे', असं झाकीर नाईक बोलले आहेत.
'सर्व मुस्लिमांनी दहशतवाही व्हावं असं मी कधीच बोललेलो नाही, त्या व्हिडिओमध्ये छेडछाड करण्यात आली आहे', असा दावा झाकीर नाईक यांनी केला आहे. 'कोणत्याही मुस्लिम व्यक्तीला मी कधी दहशत निर्माण करा असं सांगितलेलं नाही. जो कोणी लोकांची हत्या करतो, मग तो मुस्लिम असो वा नसो नरकात जातो', असं झाकीर नाईक बोलले आहेत.
ओसामा बीन लादेन याला समर्थन देण्याबद्दल मी कधीच बोललेलो नाही. सिंगापूरमधील माझ्या भाषणाच्या व्हिडिओसोबत छेडछाड करण्यात आली आहे. सोशल मिडियामध्ये व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत छेडछाड करण्यात आली आहे. मी ओसामा बीन लादेनला दहशतवादी किंवा संत काहीच म्हणलेलं नाही. मी त्याला ओळखतही नाही', असा दावा झाकीर नाईक यांनी केला आहे.
नाईक यांच्या प्रवचन व भाषणांचा एनआयए अभ्यास करीत करीत असून, त्यांच्याशी संबंधित वस्तुस्थितीबाबत अधिक सावधगिरी बाळगा व नेमकी माहिती मिळवा, असे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. नाईक भाषणांतून कोणत्याही दहशतवादी संघटनेची वकिली करतात का किंवा दहशतवादाला न्याय्य वा योग्य ठरवतात का याचा शोध एनआयएच्या गुप्तचरांना घेण्यास सांगण्यात आले आहे. नाईक हे पीस टीव्हीवर प्रवचने देतात. त्यांच्यावर इंग्लंड, मलेशिया आणि कॅनडात प्रवेश करण्यास बंदी आहे.
"प्रत्येक मुस्लिमाने दहशतवादी व्हावे, असे मी सतत सांगत असतो. ज्याची दहशत असते तो दहशतवादी.. एखाद्या चोराने पोलिस जवानास पाहिले असता त्याला दहशत वाटते. तेव्हा चोरासाठी पोलिस हा दहशतवादीच असतो. अशाच प्रकारे प्रत्येक मुस्लिमाने चोरांसाठी दहशतवादी व्हावयास हवे,‘‘ असे नाईक यांनी म्हटले होते. सध्या सौदी अरेबियामध्ये असलेले नाईक हे बांगलादेशमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत.