'भारतात दहशतवाद पसरवल्याची नाही, मात्र पत्नीला तिहेरी तलाक दिल्याची खंत'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 04:12 PM2017-09-25T16:12:40+5:302017-09-25T18:34:03+5:30
अटक झालेल्या अल-कायदाचा दहशतवादी समीऊन रेहमान याला दहशतवादी संघटनेत काम केल्याबद्दल तसंच भारतात दहशतवाद पसरवण्यासाठी रोहिंग्यांची भरती केल्याबद्दल कोणतीच खंत नाहीये. मात्र त्याला एका गोष्टीची खंत आहे, ती म्हणजे आपल्या पत्नीला ज्याप्रकारे घटस्फोट दिला
नवी दिल्ली - अटक झालेल्या अल-कायदाचा दहशतवादी समीऊन रेहमान याला दहशतवादी संघटनेत काम केल्याबद्दल तसंच भारतात दहशतवाद पसरवण्यासाठी रोहिंग्यांची भरती केल्याबद्दल कोणतीच खंत नाहीये. मात्र त्याला एका गोष्टीची खंत आहे, ती म्हणजे आपल्या पत्नीला ज्याप्रकारे घटस्फोट दिला. ढाका कारागृहातून सुटका व्हावी यासाठी समीऊन रेहमानच्या पत्नीने खूप प्रयत्न केले होते.
समीऊन रेहमान याने शबिनासोत 2015 रोजी विवाह केला होता. ढाका जेलमधून 2014 रोजी सुटका झाल्यानंतर लगेचच तीन वेळा तलाक शब्द उच्चारत त्याने शबिनाला तलाक दिला होता. शबिनाने नव्याने आयुष्याला सुरुवात करत, दुसरं लग्न केलं आहे. समीऊन रेहमानने तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
समीऊन रेहमानला 16 सप्टेंबर रोजी दिल्ली पोलिसांनी अटक केली. दिल्लीमधील विकास मार्ग येथे एका व्यक्तीला दहशतवादी संघटनेत भरती करण्याचा प्रयत्न करत असताना त्याला अटक करण्यात आली. समीऊन रेहमानने पोलिसांना माहिती दिली आहे की, तो आणि त्याची पत्नी लंडनमधील पोर्ट पूल लेन येथे शेजारी राहत होते. दोघेही एकाच शाळेत शिकले. तिचं समीऊन रेहमानवर प्रेम होतं. मात्र समीऊन रेहमानच्या प्राथमिकता वेगळ्या होत्या. त्याला पार्टी करायला तसंच अनेक तरुणींना डेट करायला आवडत होतं.
वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याने लंडनमध्ये 2010 ते 2012 दरम्यान त्याला दोनवेळा अटक करण्यात आली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेलमध्ये अल-कायदाच्या कमांडर्सनी त्याचं मन वळवलं आणि कट्टरवादी बनवलं. यानंतर त्याला दहशतवादाचं प्रशिक्षण देत सीरियाला पाठवण्यात आलं.
2014 रोजी समीऊन रेहमानने लंडनला परतला आणि शबिनाची भेट घेतली. यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. पण पुरावे हाती नसल्याने त्याची सुटका करण्यात आली. यानंतर शबिनाला कोणतीही माहिती न देता समीऊन रेहमान बांगलादेशसाठी निघून गेला. पण ढाकामध्ये उतरताच त्याला अटक करण्यात आली. यावेळी समीऊन रेहमानने शबिनाशी संपर्क साधून मदतीसाठी विनंती केली.
शबिनाने समीऊन रेहमानची सुटका करण्यासाठी पुर्ण प्रयत्न केले. याचवेळी दोघांनी आपलं प्रेम व्यक्त केलं आणि विवाहबंधनात अडकले. एप्रिल 2017 रोजी दोघेही भेटणार होते, मात्र त्यावेळी अल-कायदाकडून समीऊन रेहमानला जिहादची आठवण करुन देण्यात आली. कारागृहातून बाहेर आल्यानंतर समीऊन रेहमानने शबिनाला शेवटचा फोन करत तीन वेळा तलाक म्हणत घटस्फोट देऊन टाकला.
अल-कायदाने भारतात रोहिंग्या निर्वासितांची भरती करण्याची जबाबदारी समीऊन रेहमानला दिली होती. दिल्ली, मणिपूर आणि मिझोरम येथे बेस तयार करत भारत आणि म्यामनारशी लढण्याची जबाबदारीही सोपवण्यात आली होती. दिल्ली एका तरुणाला भरती करण्यासाठी त्याची भेट घेण्यासाठी गेला असता अटक करण्यात आली.