दहशतवाद मानवतेविरोधातच; आता वेळ आहे शांतता, बंधुभावाची - पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 01:43 PM2023-10-14T13:43:55+5:302023-10-14T13:44:23+5:30
येथे नवव्या जी-२० संसदीय अध्यक्ष परिषदेच्या (पी२०) उद्घाटन सत्राला संबोधित करताना, मोदींनी जागतिक अविश्वासाचे संकट संपवण्याचे आणि मानवकेंद्रित दृष्टिकोनाने पुढे जाण्याचे आवाहन केले.
नवी दिल्ली : जगात कोठेही कोणत्याही प्रकारचा दहशतवाद हा मानवतेच्या विरोधात आहे आणि संघर्षामुळे कोणाचाही फायदा होत नाही, एक विभाजित जग म्हणून मोठ्या जागतिक आव्हानांचा आपण सामना करू शकत नाही, ही वेळ आहे शांतता आणि बंधुभावाची, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर येथे व्यक्त केले.
येथे नवव्या जी-२० संसदीय अध्यक्ष परिषदेच्या (पी२०) उद्घाटन सत्राला संबोधित करताना, मोदींनी जागतिक अविश्वासाचे संकट संपवण्याचे आणि मानवकेंद्रित दृष्टिकोनाने पुढे जाण्याचे आवाहन केले.
“जगाच्या विविध भागात काय घडत आहे याची सर्वांनाच जाणीव आहे. जग वाद आणि संघर्षांनी ग्रासले आहे, असे जग कोणाच्याही हिताचे नाही. विभाजित जग मानवतेसमोरील मोठ्या आव्हानांवर उपाययोजना करू शकत नाही,” असे पंतप्रधान म्हणाले.
‘ईव्हीएम’मुळे पारदर्शकता वाढली...
भारतातील पुढील वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकीत १०० कोटी मतदार मतदान करतील, त्यामुळे सर्व ‘पी२०’ प्रतिनिधींनी त्या काळात भारताला भेट द्यावी, असे आवाहन मोदींनी परिषदेत केले. भारताने आतापर्यंत १७ सार्वत्रिक निवडणुका आणि ३०० हून अधिक राज्यांच्या विधानसभा निवडणुका घेतल्या आहेत आणि २०१९ मधील सार्वत्रिक निवडणुका, जिथे त्यांचा पक्ष सलग दुसऱ्यांदा विजयी झाला, ही जगातील सर्वांत मोठी निवडणूक होती, असे त्यांनी नमूद केले.
निवडणूक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) वापरामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आली आणि कार्यक्षमता वाढली, मतमोजणी सुरू झाल्यानंतर काही तासांत निकाल जाहीर केले जातात, असे मोदी म्हणाले.