दहशतवाद एवढा गाडू की वर येणारच नाही ! जम्मू-काश्मीर निवडणूक प्रचारात अमित शाह यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 11:32 AM2024-09-17T11:32:18+5:302024-09-17T11:34:31+5:30
पद्देर-नागसेनी मतदारसंघात भाजप उमेदवार व माजी मंत्री सुनील शर्मा यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
गुलाबगड (जम्मू-काश्मीर) : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे; परंतु या केंद्रशासित प्रदेशात हा दहशतवाद आता इतका खोल गाडला जाईल की पुन्हा कधीच तो बाहेर येऊ शकणार नाही, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी दिला.
किश्तवाडमध्ये आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडी जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता स्थापन करू शकणार नाही, असा दावा त्यांनी केला. पद्देर-नागसेनी मतदारसंघात भाजप उमेदवार व माजी मंत्री सुनील शर्मा यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
गेल्या पंधरवड्यात अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरचा केलेला हा दुसरा दौरा आहे. ६-७ सप्टेंबरला त्यांनी राज्य विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, तसेच कार्यकर्त्यांच्या संमेलनात मार्गदर्शन केले हाेते. राज्यातील २४ विधानसभा मतदारसंघांत सोमवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. यात पद्देर-नागसेनी मतदारसंघाचा समावेश आहे.
काँग्रेसचे नोकरी कॅलेंडर
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने सोमवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, त्यात कलम ३७० विषयी कोणताही उल्लेख नाही.
शेतकऱ्यांना दरवर्षी ४ हजार रुपये अतिरिक्त आर्थिक मदत देण्याचे, तसेच बेरोजगारांना एक वर्षासाठी प्रति महिना ३५०० रुपये बेरोजगारी भत्ता देण्यात येणार आहे.
गरिबांना रेशनवर मिळणारे धान्य ५ किलोवरून वाढवून ११ किलो करणार, सरकारी १ लाख पदे भरण्यासाठी ३० दिवसांत ‘नोकरी कॅलेंडर’ तयार करणार, अशी आश्वासनेही देण्यात आली आहेत.