काश्मिरात दहशतवाद खपवून घेणार नाही
By admin | Published: April 18, 2015 12:11 AM2015-04-18T00:11:34+5:302015-04-18T00:11:34+5:30
जम्मू-काश्मिरातील परिस्थितीवर आमची बारीक नजर असून या राज्यात दहशतवाद व फुटीरतावादी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत,
नवी दिल्ली/ जम्मू : फुटीरतावादी नेता मसरत आलम भट याच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मिरातील परिस्थितीवर आमची बारीक नजर असून या राज्यात दहशतवाद व फुटीरतावादी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे सांगत पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्रसिंग यांनी केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली.
फुटीरवाद्यांच्या चिथावणीजनक कारवायांना मुळीच थारा दिला जाणार नाही, असा इशारा जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मलसिंग यांनी दिला. भाजप व पीडीपीच्या ध्येयधोरणांमध्ये बराच फरक असला तरी राज्यातील जनतेला सरकार देण्याच्या शुद्ध विचारानेच भाजपने युती केली आहे; मात्र तत्त्वांशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे जितेंद्रसिंग यांनी नमूद केले.
राष्ट्रीयत्व, देशभक्ती पाहता केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपची भूमिका ठाम आहे. दहशतवाद किंवा फुटीरतावाद खपवून घेतला जाणार नाही, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
भारतीय भूमीवर देशविरोधी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत. युती सरकार राज्याच्या हितासाठीच असून सरकारमधील सहभाग हा भाजप किंवा केंद्राचा कमकुवतपणा मानला जाऊ नये. - किरण रिजिजू,
केंद्रीय गृहराज्यमंत्री
मुफ्ती सरकारने भाजपच्या दबावाखाली नव्हे, तर नियमांचे पालन करीत आलमला अटक केली आहे.
- वहीद- उल- रहमान पारा, पीडीपीचे प्रवक्ते