"दहशतवादास कुठलाही धर्म, देश किंवा समुहाशी जोडता कामा नये"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 07:01 PM2022-11-18T19:01:33+5:302022-11-18T19:02:21+5:30
दहशतवादाला कुठल्याही धर्म, देश किंवा वर्गाशी जोडता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नवी दिल्ली - दहशतवादी कारवायांकडे पाहण्याचा काहींचा दृष्टीकोन संकुचित असून त्याला ते धर्माशी जोडतात. मात्र, दहशतवाद हा कुठल्याही धर्माशी जोडलेला नसतो, ती एक प्रवृत्ती असून समाजविघातक आणि मानवविघातक वृत्तीने पछाडलेली लोकंच दहशतवादी कारवाया करतात. या दहशतवाद्यांना टेरर फंडींगच्या नावाने रसद पुरवली जाते. मात्र, दहशवाद्यांना होत असलेला रसद पुरवठा हाच सर्वात मोठा धोका असल्याचं केंद्रीयमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. तसेच, दहशतवादाला कुठल्याही धर्म, देश किंवा वर्गाशी जोडता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजधानी दिल्लीतील हॉटेल ताज पॅलेस दहशतवाद विरोधी वित्त पोषणवरील आयोजित 'आतंक के लिए कोई धन नही' या संमेलनात बोलताना अमित शहा यांनी दहशतवाद आणि त्यास पुरवली जाणारी रसद हाच सर्वात मोठा धोका असल्याचं म्हटलं. दहशतवाद्यांना संरक्षण देणे, रसद पुरवणे हे दहशतवादाला खतपाणी घालण्यासारखंच आहे. त्यामुळे, अशा घटकांना आणि देशांना आपल्यात सामावून न घेणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे, असेही शहा यांनी म्हटले.
दहशतवाद्यांकडून तरुणांचा वापर करण्यात येतो. टेरर फंडींगसाठी, दहशतवादी कारवाया घडविण्यासाठी तरुणांना कट्टरपंथीय बनविण्यासाठी सातत्याने नवनवीन प्रयोग केले जातात. सध्या सायबर गुन्हेगारीतून कट्टरपंथीच प्रचार करण्यात येत असून स्वत:ची ओळखही लपविली जाते. त्यामुळेच, दहशतवाद हा विश्वशांतासाठी सर्वात मोठा धोका आहे. पण, दहशतवाद्यांना पुरवण्यात येणारी आर्थिक रसद हाच सर्वात मोठा धोका असल्याचं शहा यांनी म्हटलं. आर्थिक पुरवठा झाल्यामुळेच ते साधन आणि शस्त्रसामुग्रीने परिपूर्ण होतात. त्यातून, जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थेलाही धोका निर्माण करण्याचं काम होत असल्याचं शहा यांनी म्हटलं.