कितीही वैर असले तरी दुसऱ्या देशांसाठी दहशतवादाचा वापर करू नये; सौदीच्या क्राऊन प्रिंसकडून पाकला दुहेरी धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 04:09 PM2023-09-12T16:09:04+5:302023-09-12T16:09:50+5:30
पाकिस्तान आणि सौदी एकेकाळी एवढे घनिष्ट मित्र होते की बोलू नका. अणुबॉम्ब बनविण्यासाठीही पाकला सौदीचाच पैसा होता, असे सांगितले जाते.
पाकिस्तानचा दौरा रद्द करून भारताच्या दौऱ्यावर आलेल्या सौदीचे क्राऊन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांनी पाकिस्तानला जोरदार झटका दिला आहे. सलमान यांनी पाकिस्तानच्या दहशतवादावर जोरदार वार केला आहे. एकतर त्यांनी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणे टाळले होते, दुसरीकडे दहशतवादावर बोलत पाकिस्तानला झटका दिला आहे.
भारत आणि सौदीने संयुक्त निवेदन दिले आहे. यामध्ये कोणत्याही देशाने कितीही वैर असले तरी त्या देशाविरोधात दहशतवादाचा वापर करू नये असे म्हटले आहे. तज्ञांनुसार हा इशारा थेट पाकिस्तानला होता, असे म्हटले जात आहे. पाकिस्तानला हा इशारा देणारा तोच सौदी अरेबिया आहे, ज्यांच्या सैन्यात गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानी सैनिक तैनात असतात.
याच पाकिस्तानला मुस्लिम अणुबॉम्बसाठी सौदीने पैसा पुरविला होता, असे सांगितले जाते. या सौदीने या निवेदनात जगातील राष्ट्रांना इतर देशांविरुद्ध दहशतवादाचा वापर नाकारण्याचे आणि दहशतवादी कृत्यांसाठी क्षेपणास्त्रे आणि ड्रोनसह शस्त्रास्त्रांचा पुरवठा रोखण्याचे आवाहन केले आहे. पीएम मोदी आणि सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांच्या भेटीनंतर हे संयुक्त निवेदन जारी करण्यात आले आहे.
अफगाणिस्तानचा वापर दहशतवादी आणि अतिरेकी गटांसाठी प्लॅटफॉर्म किंवा सुरक्षित आश्रयस्थान म्हणून होऊ न देण्यावरही दोन्ही नेत्यांनी भर दिला. दहशतवाद आणि आर्थिक पुरवठा रोखण्याच्या क्षेत्रात सुरक्षा सहकार्य मजबूत करण्यावर दोन्ही देशांनी भर दिला आहे. दहशतवादाला कोणत्याही विशिष्ट जात, धर्म किंवा संस्कृतीशी जोडण्याचा प्रयत्न उभयतांनी फेटाळला आहे.
हा तोच सौदी का?
पाकिस्तान आणि सौदी एकेकाळी एवढे घनिष्ट मित्र होते की बोलू नका. सौदीच्या प्रभावाखालील ओआयसी भागातून पाकिस्तान भारतावर वार करायचा. पाकिस्तानचे सैनिक सौदीच्या सैन्यात काम करत होते. 1998 मध्ये जेव्हा पाकिस्तानने अणुबॉम्बचे परिक्षण केलेले तेव्हा सौदीच पाकिस्तानला अण्वस्त्रे बनविण्यासाठी आर्थिक मदत करत असल्याचे जगभरातून म्हटले गेले होते. पाकिस्तानने याला मुस्लिम जगाचा बॉम्ब म्हटले होते.