पुन्हा एकदा दहशतवाद्यांचा हल्ला, कॅप्टनसह चार जवान शहीद; घेराव घातला असता केला गोळीबार शोधमोहीम अद्याप सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 04:00 AM2024-07-17T04:00:35+5:302024-07-17T04:01:19+5:30
अधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रीय रायफल्स व जम्मू-काश्मीर पोलिसांनी हाती घेतलेल्या विशेष मोहिमेच्या अंतर्गत देसा वन क्षेत्रातील धारी गोटे उरारबागी भागाला घेराव घालण्यात आला.
सुरेश एस. डुग्गर
जम्मू :जम्मू-काश्मीरमधील दोडा येथे सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये सोमवारी रात्री झालेल्या चकमकीत एका कॅप्टनसहित चार जवान शहीद तर एक जवान गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलाने दोडातील देसा येथील वन क्षेत्रात हाती घेतलेल्या मोहिमेदरम्यान ही चकमक झाली. त्यानंतर दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले असून, त्यांचा कसून शोध सुरू आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रीय रायफल्स व जम्मू-काश्मीर पोलिसांनी हाती घेतलेल्या विशेष मोहिमेच्या अंतर्गत देसा वन क्षेत्रातील धारी गोटे उरारबागी भागाला घेराव घालण्यात आला. त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला असता सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला प्रत्युत्तर दिले. यावेळी झालेल्या चकमकीत लष्कराचे कॅप्टन ब्रिजेश थापा, नायक डी. राजेश, जवान बिजेंद्र सिंह, अजयकुमार सिंह हे चार जण शहीद झाले, तर जम्मू-काश्मीर पोलिस दलाचा जवान गंंभीर जखमी झाला आहे. पण त्याचे नाव अद्याप कळू शकलेले नाही. शहीद जवानांपैकी कॅप्टन बृजेश थापा हे दार्जिलिंगच्या लेबोंग येथील रहिवासी आहेत.
शोधमोहिमेत ड्रोन, हेलिकॉप्टरचीही मदत
धारी गोटे उरारबागी परिसरात लष्कर व पोलिसांनी आणखी कुमक मागविली व मंगळवारी सकाळपासून पुन्हा दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
त्यासाठी ड्रोन व हेलिकॉप्टरचीही मदत घेतली आहे. हे दहशतवादी काही महिन्यांपूर्वी सीमा ओलांडून काश्मीरमध्ये आले व जंगलात दडून बसले होते.
तीन आठवड्यांत तिसरी मोठी चकमक
गेल्या तीन आठवड्यांत दोडा जिल्ह्यामध्ये झालेली ही तिसरी मोठी चकमक आहे. आठवडाभरापूर्वी कठुआ जिल्ह्यातील मचेडी वन क्षेत्रात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पाच जवान शहीद व काही जवान जखमी झाले होते.
सोमवारी रात्री राष्ट्रीय रायफल्स व जम्मू-काश्मीर पोलिसांनी सुरू केलेल्या संयुक्त शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरू झाली. त्यावेळी दहशतवाद्यांनी पळण्याचा प्रयत्न केला; पण कॅप्टन ब्रिजेश थापा यांच्या नेतृत्वाखालील तुकडीने त्यांचा पाठलाग सुरू ठेवला.
त्यानंतर पुन्हा सोमवारी चकमक झाली. त्यावेळी कॅप्टनसहित चार जवान शहीद झाले. त्यांना लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी व अन्य लष्करी अधिकाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.