भारतीय लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांचा गोळीबार, 3 आठवड्यांत दुसरा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 09:31 PM2024-01-12T21:31:26+5:302024-01-12T21:31:53+5:30
सध्या या भागात गोळीबार सुरू आहे. हा परिसर रिकामा करून लष्कराने शोधमोहीम राबवली आहे.
जम्मू-काश्मीरमधील पुंछ सेक्टरमध्ये शुक्रवारी दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या वाहनावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी पूंछ जिल्ह्यातील खनेतर भागात दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनांवर हल्ला केला. यानंतर लष्काराच्या जवानांनी दहशतवाद्यांचा जोख प्रत्युत्तर दिले. सुदैवाने दहशतवाद्यांच्या या हल्यात कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
सध्या या भागात गोळीबार सुरू आहे. हा परिसर रिकामा करून लष्कराने शोधमोहीम राबवली आहे. तसेच, या भागात किती दहशतवादी लपले आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वृत्तानुसार, पुंछमधील रस्त्यालगत असलेल्या टेकडीवरून लष्कराच्या वाहनावर दोन राऊंड गोळीबार करण्यात आला. या घटनेत लष्करातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वाहनाचे नुकसान झाले आहे. दहशतवादी गोळीबार केल्यानंतर तिथून पळून गेले. त्यानंतर जवानांकडून त्यांचा शोध सुरु आहे.
दरम्यान, रिपोर्टनुसार पीर पंजाल रेंज अंतर्गत राजौरी आणि पुंछ सेक्टर 2003 पासून दहशतवादापासून मुक्त होता, परंतु ऑक्टोबर 2021 पासून येथे पुन्हा मोठे हल्ले सुरू झाले आहेत. गेल्या सात महिन्यांत येथे अधिकारी आणि कमांडोसह 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. या भागात गेल्या दोन वर्षांत 35 हून अधिक जवान शहीद झाले आहेत.
3 आठवड्यांत दुसरा हल्ला
गेल्या तीन आठवड्यांत या भागात लष्करावर झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. यापूर्वी राजौरीतील डेरा गल्लीत दोन लष्करी वाहनांवर झालेल्या हल्ल्यात चार जवान शहीद झाले होते, तर पाच जण जखमी झाले होते. आज संध्याकाळी पहिल्या हल्ल्याच्या ठिकाणापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर लष्कराच्या वाहनांवर हल्ला झाला.