जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले वाढले; मृत्युमुखींच्या संख्येत 89 टक्क्यांनी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 08:36 AM2018-09-22T08:36:15+5:302018-09-22T10:06:17+5:30
दहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी
नवी दिल्ली : सलग दुसऱ्या वर्षी अमेरिकन सरकारनं दहशतवाद पीडित देशांच्या यादीत भारताला तिसरं स्थान दिलं आहे. याबद्दलची आकडेवारी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं प्रसिद्ध केली आहे. दहशतवादाचा फटका बसणाऱ्या देशांची यादी दरवर्षी अमेरिकेकडून तयार करण्यात येते. यावर्षी या यादीत इराक पहिल्या, तर अफगाणिस्तान दुसऱ्या क्रमांरावर आहे. अमेरिकेकडून धोकादायक दहशतवादी संघटनांचीही यादी तयार करण्यात आली आहे. जगातील दहशतवादी संघटनांचा विचार केल्यास इसिस, तालिबान, अल-शबाब यांच्यानंतर सीपीआय-माओवादी संघटना चौथ्या स्थानी आहे.
2015 मध्ये दहशतवादग्रस्त देशांच्या यादीत पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून भारत तिसऱ्या स्थानावर आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं याबद्दलची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये जम्मू-काश्मीरमधील वाढत्या हल्ल्यांचादेखील समावेश आहे. 2017 मध्ये जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये 24 टक्क्यांनी वाढ झाली. तर या हल्ल्यांमध्ये मृत्यूमुखी पावलेल्यांचं प्रमाण तब्बल 89 टक्क्यांनी वाढलं, अशी आकडेवारी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं प्रसिद्ध केली आहे. 2017 मध्ये भारतात एकूण 860 दहशतवादी हल्ले झाले. यातील 25 टक्के हल्ले एकट्या जम्मू-काश्मीरमध्ये झाले, अशी आकडेवारी अमेरिकेन सरकारच्या अहवालात आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील दहशतवादात मोठा फरक असल्याचं भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. 'भारतात होणाऱ्या बहुतांश दहशतवादी हल्ल्यांना पाकिस्तानचा पाठिंबा असतो. पाकिस्तानमधूनच या हल्ल्यांची योजना आखली जाते. पाकिस्तानच्या यंत्रणा आणि त्यांचं लष्कर या हल्ल्यांना प्रोत्साहन देतं. मात्र पाकिस्तानमध्ये होणाऱ्या हल्ल्यांमध्ये भारताचा हात नसतो. पाकिस्ताननं ज्या दहशतवादी संघटना पोसल्या, त्याच तिथे हल्ले घडवतात,' असं भारतीय लष्करातील एका अधिकाऱ्यानं म्हटलं.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं जगातील धोकादायक दहशतवादी संघटनांचाही यादी तयार केली आहे. यामध्ये सीपीआय-माओवादी संघटना चौथ्या क्रमांकावर आहे. भारतात झालेल्या 53 टक्के हल्ल्यांमध्ये याच संघटनेचा हात असल्याची आकडेवारी अमेरिकेनं दिली आहे. '2016 आणि 2017 मध्ये माओवाद्यांचे हल्ले कमी झाले आहेत. मात्र हल्ल्यांची संख्या कमी झाली असली, तरी त्यात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 16 टक्क्यांनी वाढली आहे. तर जखमींच्या संख्येत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे,' अशी आकडेवारी अहवालात आहे.