स्वातंत्र्यदिनी काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, एक अधिकारी शहीद

By Admin | Published: August 15, 2016 10:08 AM2016-08-15T10:08:37+5:302016-08-15T13:39:29+5:30

देशभरात सर्वत्र भारताचा ७० वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना श्रीनगरमधील नौहट्टा येथील सीआरपीएफच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला.

A terrorist attack in Kashmir, an official martyr | स्वातंत्र्यदिनी काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, एक अधिकारी शहीद

स्वातंत्र्यदिनी काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, एक अधिकारी शहीद

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. १५ - आज देशभरात सर्वत्र भारताचा ७० वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना श्रीनगरमधील नौहट्टा येथील सीआरपीएफच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला. अचानक हल्ला होताच डयुटीवर तैनात असलेल्या जवानांनी त्याला लगेच प्रत्युत्तर दिले. यावेळी झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा एक अधिकारी शहीद झाला. नऊ जवान जखमी झाले. 
 
नौहट्ट येथील एका मोठया निवासी भागाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीआरपीएफ जवानांवर तीन बाजूंनी गोळीबार झाला. जवानांनी या हल्ल्याला उत्तर देताच अतिरेक्यांनी शेजारच्या घरांचा आश्रय घेतला. सकाळी आठच्या सुमारास हा हल्ला झाला. आता ही चकमक थांबली असून, सीआरपीएफकडून या भागामध्ये आता शोधमोहिम सुरु आहे. 
 
हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची शक्यता आहे. हे दहशतवादी ठार झाले कि, निसटले ते अद्यापी स्पष्ट झालेले नाही. जखमींमध्ये एक पोलिस अधिकारी आणि आठ सीआरपीएफच्या जवानांचा समावेश आहे.  
 
नौहट्टा श्रीनगरच्या बक्षी स्टेडियमच्या जवळ आहे. याच बक्षी स्टेडियमवर झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती सहभागी झाल्या होत्या. स्वातंत्र्य दिनी संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये सर्तकतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. 
 
दिल्लीत लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशाला उद्देशून भाषण सुरु असताना हा हल्ला झाला. आपल्या भाषणात मोदींनी पाकिस्तानवर दहशतवादाला खतपाणी घालत असल्याबद्दल कठोर शब्दात टीका केली. 
 
 

 

Web Title: A terrorist attack in Kashmir, an official martyr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.