कठुआमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; चार जवान शहीद, तर चार गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 06:47 PM2024-07-08T18:47:18+5:302024-07-08T18:48:04+5:30
जम्मूच्या कठुआमध्ये लष्कराच्या ताफ्यावर ग्रेनेड फेकून गोळीबार करण्यात आला आहे.
Jammu-Kashmir : जम्मूच्या कठुआमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. मछेडी परिसरात दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड फेकून गोळीबार केला. या हल्ल्यात काही जवान जखमी झाले होते, त्यातील चार जवानांना वीरमरण आले असून, इतर चौघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या शोधासाठी पथकेही रवाना झाली आहेत.
#UPDATE | Four Indian Army soldiers have been killed while an equal number are injured in the terrorist attack in Machedi area of Kathua. The firefight between troops and the terrorists is on. More details awaited: Defence officials https://t.co/IfGjVDT9rx
— ANI (@ANI) July 8, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराचे वाहन जात होते, यावेळी अचानक टेकडीवर लपलेल्या दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले आणि गोळीबार केला. यानंतर सुरक्षा दलानेही चोख प्रत्युत्तर दिले. सुरुवातीला या घटनेत दोन जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली होती, पण आता यात चार जवान शहीद झाल्याची माहिती आहे.
राजौरी येथील लष्कराच्या तळावर हल्ला
रविवारी राजौरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. रात्रीच्या अंधारात लष्कराच्या छावणीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. यावेळी सुरक्षा चौकीवर तैनात असलेल्या जवानानेही दहशतवाद्यांवर गोळीबार केला. या घटनेत जवान जखमी झाला, तर अंधाराचा फायदा घेत दहशतवादी पळून गेले.
कुलगाममध्ये दोन जवान शहीद
जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शनिवारी(दि.6) भीषण चकमक झाली. या घटनेत दोन जवान शहीद झाले, तर सहा ते आठ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. कुलगाम जिल्ह्यातील मोदरगाम आणि चिनिगाम गावात ही चकमक झाली होती. या चकमकीत पॅरा कमांडो लान्स नाईक प्रदीप कुमार शहीद झाले, तर दोन ते तीन दहशतवादी ठार झाले. तर, दुसरी चकमक फ्रिसल चिनिगाम गावात झाली. या चकमकीत अकोल्यातील रहिवासी आणि राष्ट्रीय रायफल्सचे हवालदार प्रदीप जंजाळ शहीद झाले, तर लष्कर-ए-तैयबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.