जम्मू-श्रीनगर महामार्गावर पोलिसांवर गोळीबार; दोन संशयित दहशतवादी फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 11:06 AM2018-09-12T11:06:42+5:302018-09-12T11:09:08+5:30
पोलिसांकडून ट्रकमधील शस्त्रसाठा जप्त
जम्मू: जम्मू-काश्मीरमधील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय मार्गावर वाहनांची तपासणी करताना पोलिसांवर गोळीबार झाला आहे. हल्लेखोरांची संख्या दोन ते तीन होती, अशी माहिती समोर येत असून ते दहशतवादी असण्याची शक्यता पोलीस दलाकडून वर्तवण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांना वाहनांची तपासणी करताना एका ट्रकमध्ये एक एके सीरिजमधील रायफल आणि 3 मॅगझिन्स सापडल्या आहेत. त्यामुळे हल्लेखोर दहशतवादी असावेत, हा संशय बळावला आहे. पोलिसांनी ट्रकच्या चालक आणि क्लिनरला ताब्यात घेतलं आहे.
राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची तपासणी सुरू असताना अचानक पोलीस दलावर गोळीबार झाला. ट्रकमधून उतरलेल्या हल्लेखोरांनी हा गोळीबार केला. यानंतर पोलिसांनी हल्ल्याला प्रत्युत्तर देताच हल्लेखोरांनी पळ काढला. यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं. ट्रकमधून जप्त करण्यात आलेलं सामान पाहता, हल्लेखोर दहशतवादी असावेत, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हल्लेखोरांच्या गोळीबारात कोणीही जखमी झालेलं नाही.
जम्मू-काश्मीर पोलील दलाच्या एका पथकाकडून झज्जर कोटलीजवळ नाकेबंदी सुरू होती. त्यामुळे ट्रकची मोठी रांग लागली होती. त्यावेळी एका ट्रकमधून पोलिसांवर गोळीबार सुरू झाला. थोड्याच संशयित दहशतवाद्यांनी पलायन केलं. यानंतर वाहनांची तपासणी करणाऱ्या पोलिसांनी या हल्ल्याची माहिती लष्कर आणि सीआरपीएफला दिली. यानंतर लष्करी जवानांनी पोलिसांच्या साथीनं परिसरात सर्च ऑपरेशन सुरू झालं.