काश्मिरात मारले गेलेले दहशतवादी विदेशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2016 03:44 AM2016-02-15T03:44:06+5:302016-02-15T03:44:06+5:30
उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात शनिवारी उडालेल्या चकमकीत मारले गेलेले सर्व पाचही दहशतवादी विदेशी नागरिक होते आणि ते लष्कर- ए- तोयबाचे सदस्य होते, असा दावा भारतीय लष्कराने केला आहे.
श्रीनगर : उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात शनिवारी उडालेल्या चकमकीत मारले गेलेले सर्व पाचही दहशतवादी विदेशी नागरिक होते आणि ते लष्कर- ए- तोयबाचे सदस्य होते, असा दावा भारतीय लष्कराने केला आहे.
‘या दहशतवाद्यांजवळून जप्त केलेली शस्त्रे व अन्य साहित्यावरून ते विदेशी नागरिक आणि लष्कर- ए- तोयबाचे सदस्य असल्याचे स्पष्ट झाले आहे,’ असे लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी सांगितले. दहशतवाद्यांसोबतच्या या चकमकीत शहीद झालेल्या दोन कमांडर्सना श्रद्धांजली वाहिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
तथापि, हे पाचही दहशतवादी नुकतेच भारतात घुसले होते की, आधीपासूनच मुक्कामाला होते किंवा ते एखाद्या नव्या दहशतवादी गटाचे सदस्य होते काय, हे मात्र स्पष्ट झालेले नाही, असे दुआ म्हणाले. या भागात आणखी किती दहशतवादी दडून बसलेले आहेत याचा शोध घेतला जात आहे.
जैश- ए- मोहंमदचा या भागात फारसा प्रभाव असेल, असे वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कुपवाडाच्या झोनरेशी गावात शुक्रवारी सुरू झालेली चकमक शनिवारी संपली होती, ज्यात हे पाच दहशतवादी ठार आणि दोन जवान शहीद झाले होते.
घुसखोरीत घट झाल्याचा दावा
मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी काश्मिरात सीमेपलीकडून होणारी घुसखोरी कमी झाली आहे. घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे आणि दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत पाठविणाऱ्या ठिकाणी शंभरपेक्षाही कमी दहशतवादी आहेत, असा दावा लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी केला.
२०१५ मध्ये घुसखोरीच्या ६०० पेक्षा जास्त घटना घडल्या होत्या. आता त्यात घट झाली आहे. आता शंभरेक दहशतवादी सीमेपलीकडे घुसखोरीच्या तयारीत असू शकतात; पण ही संख्या गतवर्षीच्या मानाने कमीच आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)