काश्मीरमधील गांदरबलच्या जंगलात सापडला दहशतवाद्यांचा अड्डा, शस्त्रास्त्रे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 07:32 PM2018-11-26T19:32:48+5:302018-11-26T19:48:55+5:30
लष्कराने उघडलेल्या जोरदार आघाडीमुळे काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांची दाणादाण उडाली आहे. दरम्यान, खोऱ्यातील गांदरबल जिल्ह्यातील दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त केला आहे.
श्रीनगर - लष्कराने उघडलेल्या जोरदार आघाडीमुळे काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांची दाणादाण उडाली आहे. गेल्या तीन-चार दिवसांत लष्कराने 15 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दरम्यान, खोऱ्यातील गांदरबल जिल्ह्यातील दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त केला आहे. लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई करून गांदरबलच्या जंगलातील दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणाचा छडा लावत ते उद्ध्वस्त करण्यात आले आहे. तसेच त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनंतर जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलांनी गांदरबलच्या जंगली भागात शोधमोहीम सुरू केली होती. या शोधमोहिमेदरम्यान सुरक्षा दलांना दहशतवाद्यांच्या या गुप्त ठिकाणाचा छडा लागला. त्या ठिकाणाहून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. तसेच या संदर्भात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
#JammuAndKashmir: 1 INSAS Rifle, 80 rounds of INSAS lives, 37 rounds of AK47 among other arms & ammunition & paraphernalia recovered from the terrorist hideout busted by police & security forces in forest area of Ganderbal pic.twitter.com/laYsdPIQ7Z
— ANI (@ANI) November 26, 2018
सुरक्षा दलांनी काश्मीरमधील दहशतवाद्यांविरोधात आक्रमक कारवाईला सुरुवात केली आहे. गेल्या आठवडाभरामध्ये राज्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी 16 दहशतवाद्यांच्या खात्मा केला आहे. शोपियानमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी (25 नोव्हेंबर) झालेल्या चकमकीदरम्यान सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. या चकमकीत लष्कराचा एक जवान जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शुक्रवारी अनंतनाग जिल्ह्यात जवान व दहशतवाद्यामध्ये झालेल्या चकमकीत दहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अनंतनागमध्ये खात्मा करण्यात आलेले सर्व दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबा व हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांमध्ये कार्यरत असल्याचा संशय आहे. तर यातील एक दहशतवादी अजाद मलिक हा ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्या प्रकरणात सहभागी होता.