परफ्युमद्वारे स्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट, गुप्तचर यंत्रणांनी केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 03:12 PM2023-07-12T15:12:12+5:302023-07-12T15:12:37+5:30
Perfume IED : परफ्यूम आयईडीचा धोका लक्षात घेता जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
सुरक्षा दलांवर हल्ला करण्यासाठी जम्मू-काश्मीरमधीलदहशतवादी गटांकडून परफ्यूम आयईडीचा (Perfume IED) वापर केला जाऊ शकतो, अशी भीती गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार, सीमेपलीकडून ड्रोनद्वारे परफ्यूम आयईडी देशाच्या आत पाठवण्याचा कट आहे. परफ्यूम आयईडीचा धोका लक्षात घेता जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर परफ्यूम आयईडीच्या या धोक्याची गंभीर दखल घेतली जात आहे. अशा हल्ल्यांसाठी दहशतवादी मॅग्नॅटिक बॉम्बसारख्या परफ्यूम आयईडीचा वापर करू शकतात, असा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे. दरम्यान, परफ्यूम आयईडी हा एक विशेष प्रकारचा बॉम्ब आहे, जो परफ्यूममधून दिसणार्या कोणत्याही बाटलीत किंवा पॅकेटमध्ये ठेवला जातो. यादरम्यान, कुणी दाबले की त्यात स्फोट होतो.
अशा परफ्यूम आयईडीचा वापर कोणत्याही व्हीआयपी व्यक्तीला लक्ष्य करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. सुरक्षा एजन्सींकडून एका वृत्तवाहिनीला मिळालेल्या माहितीनुसार, परफ्यूम आयईडीवजनाने खूप हलके असतात आणि अशा परिस्थितीत ते ड्रोनच्या माध्यमातून कोणत्याही ठिकाणी सहजपणे हवेत सोडले जाऊ शकतात. इतकेच नाही तर असे आयईडी मेटल डिटेक्टर आणि आयईडी स्निफर डॉगच्याही पकडीत येत नाहीत.
दरम्यान, यावर्षी फेब्रुवारीमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांनी जम्मूच्या नरवालमध्ये एका दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला होता. आरिफ नावाच्या या दहशतवाद्याकडून परफ्यूम आयईडीही जप्त करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी त्यावेळी एका मीडिया वक्तव्यात सांगितले होते की, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून अशा प्रकारचा परफ्यूम आयईडी जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे.