दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 18:06 IST2025-04-22T18:05:23+5:302025-04-22T18:06:02+5:30
Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला आहे. पहलगाममधील बैसरन परिसरात दोन ते तीन दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात काही पर्यंटकांचा मृत्यू झाल्याची, तर काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती येत आहे.

दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला आहे. पहलगाममधील बैसरन परिसरात दोन ते तीन दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात काही पर्यंटकांचा मृत्यू झाल्याची, तर काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती येत आहे. दरम्यान, या दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी नाव विचारल्याची आणि हिंदू असल्याची ओळख पटल्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांनी दिली आहे.
घटनास्थळावरून समोर येत असलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात १२ पर्यटक जखमी झाले आहेत. त्यापैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर या हल्ल्यात एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात झालेल्या हानीबाबत जम्मू काश्मीर पोलीस आणि प्रशासनाकडून अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, या हल्ल्यात जखमी झालेल्या काही पर्यटकांबाबत समोर आलेल्या माहितीनुसार या दहशतवादी हल्ल्यामध्ये गुजरातमधील तीन आणि कर्नाटकमधील दोन पर्यटक जखमी झाले आहेत. रीनो पांडेय, डॉक्टर परमेश्वर, बीनो भट्ट, माणिक पटेल यांची नावं जखमींच्या यादीमध्ये आहेत.
या हल्ल्याबद्दल एका वृत्तवाहिनीशी बोलताना माजी डीजीपींनी सांगितले की, पहलगाममधील दहशतवादी हल्ला हा चिंताजनक आहे कारण अमरनाथ यात्रा काही दिवसांत सुरू होणार आहे आणि तिचा बेस कॅम्प पहलगाममध्येच आहे. शिवाय पर्यटकही मोठ्या संख्येने येत आहेत. बहुतेक दहशतवादी पर्यटकांवर हल्ला करत नाहीत, कारण याचा परिणाम स्थानिक रहिवाशांच्या व्यवसायावरही होतो.