लष्करी वाहनावर ग्रेनेड हल्ला; कठुआत पाच जवान शहीद, पाच जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 07:22 AM2024-07-09T07:22:16+5:302024-07-09T07:22:28+5:30
सध्या दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरूच असून, जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुरेश एस. डुग्गर
लोकमत न्यूज नेटवर्क जम्मू : जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील माचेडी भागात लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला असून, यात पाच जवान शहीद तर पाच जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनांना लक्ष्य करत ग्रेनेड फेकले आणि गोळीबार केला. कठुआ शहरापासून १५० किमी अंतरावर असलेल्या लोहाई मल्हार येथील बदनोटा गावाजवळ दुपारी ३:३० च्या सुमारास ही वाहने नियमित होते. गस्तीवर असताना दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले, पण दहशतवादी जवळच्या जंगलात पळून गेले. सध्या दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरूच असून, जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लष्कराच्या वाहनावरील घटना
दोन महिन्यांत लष्कराच्या वाहनावर झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे.
४ मे रोजी पूंछमधील शाहसीतार भागात हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. यात कॉर्पोरल विकी पहाडे शहीद झाले होते आणि इतर जवान जखमी झाले.
१२ जानेवारी रोजी पूछ येथे सैनिकांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला.
२१ डिसेंबर रोजीही सुरनकोट येथे लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.
दोन दिवसांतील दुसरा हल्ला
दोन दिवसांत लष्करावर झालेला हा दुसरा हल्ला आहे. रविवारी सकाळी दहशतवाद्यांनी राजौरी जिल्ह्यातील मंजाकोटमध्ये लष्कराच्या तळावर हल्ला केला, यात एक जवान जखमी झाला. जवानांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर दहशतवादी जंगलातून पळून गेले.
अलीकडील घटना...
२६ जून : डोडामध्ये ३ दहशतवादी ठार
२२ जून: उरीमध्ये २ दहशतवादी ठार
१९ जून : हादीपोरामध्ये दोन दहशतवादी ठार
१७ जून : बांदीपोरामध्ये सुरक्षा दलांनी एलईटीचा कमांडर उमर अकबर लोन ऊर्फ जाफरचा खात्मा केला.
तिजोरीमागे सापडले बंकर
कुलगाम जिल्ह्यात शनिवारी रात्री झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचे सहा दहशतवादी मारले गेले. या चकमकीत दोन जवानही शहीद झाले आहेत. या दरम्यान येथे लष्कराने तपास मोहीम राबविली असता येथे एका घराच्या तिजोरीमागे चक्क दहशतवाद्यांचे बंकर सापडले. येथे दहशतवादी लपून बसायचे तसेच शस्त्रे आणि दारूगोळाही ठेवायचे.
या बंकरबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आले नसली तरी हा बंकर बांधण्यासाठी स्थानिक लोकांनी मदत केली असावी, असे अधिकाऱ्याऱ्यांचे मत आहे. व्हिडीओनुसार, सुरक्षा अधिकारी एका व्यक्तीच्या घराची झडती घेत असताना तिजोरीमागे एक बंकर आढळून आले, यात दहशतवादी लपून राहात होते. हे बंकर आहे हे न कळण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली होती.
प्रमुख व्यक्तींची सुरक्षा काढली
राज्यातील संभाव्य विधानसभा निवडणुकांपूर्वी, उपराज्यपाल प्रशासनाने अनेक प्रमुख राजकीय नेते, माजी न्यायाधीश आणि पोलिस अधिकाऱ्यांची सुरक्षा काढून घेतली आहे.
सुमारे ५७ जणांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. काश्मीरमध्ये सर्व काही ठीक आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न असल्याचे राजकीय पंडितांनी म्हटले आहे.