पाकमधूनच आले होते दहशतवादी
By admin | Published: July 31, 2015 01:56 AM2015-07-31T01:56:20+5:302015-07-31T01:56:20+5:30
गेल्या सोमवारी पंजाबच्या गुरुदासपूर येथे आत्मघाती हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानातूनच आले होते आणि त्यांनीच हल्ला करण्यापूर्वी जम्मू-पठाणकोट रेल्वे मार्गावर बॉम्ब पेरून ठेवले होते
नवी दिल्ली : गेल्या सोमवारी पंजाबच्या गुरुदासपूर येथे आत्मघाती हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानातूनच आले होते आणि त्यांनीच हल्ला करण्यापूर्वी जम्मू-पठाणकोट रेल्वे मार्गावर बॉम्ब पेरून ठेवले होते, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. सीमेपलीकडून होणारी ही घुसखोरी रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी उपाययोजना करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
राजनाथसिंह यांनी गुरुवारी राज्यसभेत प्रचंड गदारोळातच गुरुदासपूर हल्ल्यावर निवेदन केले. ते म्हणाले, पंजाब पोलिसांनी यशस्वी मोहीम राबवून या तिन्ही दहशतवाद्यांना ठार केले; परंतु या दरम्यान होमगार्डचे तीन जवान, एक पोलीस अधीक्षक शहीद झाले, तसेच तीन नागरिक ठार, तर दहा नागरिक व सात पोलीस जखमी झाले. दहशतवाद्यांकडून तीन एके-४७ रायफल्स, १९ मॅगझिन्स आणि दोन जीपीएस हस्तगत करण्यात आले आहेत. काँग्रेस सदस्यांच्या गोंधळातच राजनाथसिंह पुढे म्हणाले, ‘भारतातून दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यास सरकार कटिबद्ध आहे. घुसखोरीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी उपाय केले जातील.’ (लोकमत न्यूज नेटवर्क)
काँग्रेसचे बेजबाबदार वर्तन -जेटली
राजनाथसिंह यांना गुरुदासपूरमधील दहशतवादी हल्ल्यावर निवेदन करण्यापासून रोखण्याची काँग्रेसची कृती बेजबाबदारपणाची आहे, असे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे.
सीमापार दहशतवादावर संसदेत निवेदन करण्यापासून राजनाथसिंह यांना रोखून काँग्रेसने देशाची प्रतिमा ‘विभक्त घर’ म्हणून सादर केली आहे, असे जेटली म्हणाले. याकूब मेमनच्या फाशीबाबत काँग्रेस नेत्यांनी केलेल्या विधानांवरही त्यांनी आक्षेप घेतला. काँग्रेस नेत्यांनी केलेली बेजबाबदार वक्तव्ये ही चिंतेचा विषय आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या मुद्यावर पक्षाची भूमिका मांडावी, असे आवाहन जेटली यांनी केले.
गुरुदासपूरचा हल्ला हा पाकिस्तान प्रायोजित असल्याचा आरोप त्यांनी केला. तथापि या हल्ल्यानंतरही पाकिस्तानशी वाटाघाटी सुरू राहणार किंवा काय याचा खुलासा मात्र त्यांनी केला नाही.
राजनाथसिंह हे निवेदन देत असताना काँग्रेस सदस्यांनी प्रचंड गोंधळ घातला. ‘हे राजकारण नाही. दहशतवादी हल्ल्यावरील निवेदन आहे,’ असे सांगून उपसभापती पी. जे. कुरियन यांनी त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले; परंतु काँग्रेस सदस्य शांत झाले नाहीत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध जोरदार घोषणा दिल्या.
भारताचा आरोप पाकने फेटाळला
इस्लामाबाद- पंजाबमधील गुरुदासपूर हल्ल्यातील आरोपी पाकिस्तानातून आल्याचा भारताचा आरोप पाकिस्तानने फेटाळून लावला आहे. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर चौकशी न करताच पाकिस्तानकडे बोट दाखविणे हे योग्य नाही असे पाकने म्हटले आहे.
गुरुदासपूर येथील हल्ल्याचा आम्हीही कडक शब्दात निषेध केला आहे असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते काझी खलिलुल्ला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.