दादरीच्या सुडासाठी दहशतवाद्यांचा कट
By Admin | Published: October 16, 2015 04:13 AM2015-10-16T04:13:00+5:302015-10-16T04:13:00+5:30
दादरी हत्याकांड आणि मैनपुरीतील जातीय तणावानंतर उत्तर प्रदेशातील दहशतवादी गट सक्रिय झाले असून राज्यातील काही शहरांमध्ये स्फोट घडविण्याची त्यांची योजना आहे.
नवी दिल्ली : दादरी हत्याकांड आणि मैनपुरीतील जातीय तणावानंतर उत्तर प्रदेशातील दहशतवादी गट सक्रिय झाले असून राज्यातील काही शहरांमध्ये स्फोट घडविण्याची त्यांची योजना आहे.
इंटेलिजन्स ब्युरो आणि इतर गुप्तचर संस्थांनी उत्तर प्रदेश पोलिसांना याबाबत सतर्क केले आहे. दहशतवाद्यांचे काही संदेश गुप्तचर संस्थांनी टिपले असून त्यावरून दहशतवादी संघटनांच्या हल्ल्याच्या कटाचा खुलासा झाला आहे. या माहितीनंतर उत्तर प्रदेशात अलर्ट जारी करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल आणि प्रवीण तोगडिया यांच्यासारखे हिंदुत्ववादी नेतेही दहशतवाद्यांचे लक्ष्य आहेत. सध्या राज्यात पंचायत निवडणुका सुरू असून उत्सवाचे दिवस आहेत. याच परिस्थितीचा फायदा घेण्याचा विचार दहशतवादी करीत आहेत. गुप्तचरांच्या हाती लागलेल्या दोन व्यक्तींच्या संभाषणामध्ये राज्यातील स्लीपर सेलसंदर्भात माहितीची देवाणघेवाण केली आहे. त्यांच्या बोलण्यात अनेकदा अलाहाबादमधील एका व्यक्तीचा उल्लेख आला आहे. दहशतवादी गटातील पुरुषांच्या जाळ्यात अडकलेल्या काही महिला पोलीस अधिकारी या कारवायांमध्ये मदत करतील, अशीही ग्वाही हे दोघे देत असल्याचे यातून स्पष्ट होते. (वृत्तसंस्था)
>काशी विश्वनाथ मंदिर आणि अयोध्येतील राम मंदिर परिसरात घातपाताचा धोका आहे. याशिवाय उत्तर प्रदेश विधानसभा, अलाहाबाद उच्च न्यायालय, कानपूर रेल्वेस्टेशन आणि अलाहाबाद लष्करी वसाहतीवर हल्ल्याचा कट रचण्यात येत आहे,अशी माहिती पोलिसांनी दिली. सुरक्षा संस्थांनी याप्रकरणी अलाहाबादेतून दोन लोकांना अटक केली आहे.