दहशतवाद्यांनी दिली होती ठार मारण्याची धमकी

By admin | Published: January 5, 2016 11:35 PM2016-01-05T23:35:20+5:302016-01-05T23:35:20+5:30

‘आमच्या डोळ्यांवर पट्टी आणि हात मागे बांधण्यात आले होते आणि वर बघितले तर ठार मारू अशी धमकी त्या चार ते पाच दहशतवाद्यांनी आम्हाला दिली होती.

The terrorists had threatened to kill | दहशतवाद्यांनी दिली होती ठार मारण्याची धमकी

दहशतवाद्यांनी दिली होती ठार मारण्याची धमकी

Next

पठाणकोट : ‘आमच्या डोळ्यांवर पट्टी आणि हात मागे बांधण्यात आले होते आणि वर बघितले तर ठार मारू अशी धमकी त्या चार ते पाच दहशतवाद्यांनी आम्हाला दिली होती.’ ही आपबिती आहे पठाणकोट हवाईदल तळावर हल्ला करणाऱ्या सशस्त्र दहशतवाद्यांच्या तावडीतून सुखरूप बाहेर पडलेले गुरुदासपूरचे पोलीस अधीक्षक सलविंदरसिंग यांची. हल्लेखोर दहशतवाद्यांनी सिंह यांचे वाहन बळजबरीने हिसकावून नेले होते.
हल्ल्यानंतर मंगळवारी प्रथमच सलविंदरसिंग यांनी अपहरणाच्या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली. एके ४७ रायफलधारी दहशतवाद्यांना सुरुवातीला मी एक पोलीस अधिकारी असल्याची कल्पना नव्हती. परंतु माझ्या अंगरक्षकाचा फोन आला तेव्हा दहशतवाद्यांनीच तो घेतला. त्यानंतर त्यांना आपण एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला पकडले असल्याचे लक्षात आले. त्यांनी माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि माझे तीन मोबाईल तसेच गाडी घेऊन फरार झाले, असे सिंग यांनी सांगितले.
दहशतवादी मला ठार मारण्यासाठी परत आले होते. परंतु तोपर्यंत मी आपले हात सोडून घटनास्थळावरून निघून गेलो होतो, असा दावाही त्यांनी केला. आपण साधा पोषाख का केला होता आणि आपला अंगरक्षक सोबत का नव्हता? असा प्रश्न विचारला असता पोलीस अधीक्षक म्हणाले, मी पीरबाबाच्या प्रार्थनेला गेलो होतो. त्यामुळे गणवेश घातला नव्हता आणि सुरक्षाजवानास सोबत नेले नव्हते. दहशतवादी उर्दु, पंजाबी आणि हिंदी भाषेत बोलत होते. परंतु अंधार असल्याने त्यांची नेमकी संख्या कळू शकली नाही. चार ते पाच दहशतवादी होते असा अंदाज आहे. सलविंदरसिंग हे त्यांचे मित्र राजेश वर्मा आणि स्वयंपाकी मदन गोपाल यांच्यासोबत गुरुवारी रात्री प्रार्थना करून परतत असताना दहशतवाद्यांनी मार्गात त्यांचे वाहन अडविले होते. सर्व दहशतवादी एके ४७ रायफली आणि जीपीएसने सज्ज होते. सुरुवातीला पोलीस अधीक्षक व स्वयंपाक्यास गाडीतून खाली फेकण्यात आले होते. परंतु राजेश यांना ओलीस ठेवून त्यांच्यावर हल्ला केला होता. आपण दहशतवाद्यांना विरोध का केला नाही? या प्रश्नाला उत्तर देताना सिंग म्हणाले, सशस्त्र दहशतवाद्यांपुढे मी काय करू शकणार होतो. परंतु घटनेनंतर मी लगेच वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस महासंचालक, सहायक पोलीस महासंचालक आणि इतर अधिकारी पठाणकोटमध्ये डेरेदाखल झाले. माझ्याकडे जी माहिती होती ती मी तात्काळ आणि योग्य पद्धतीने दिली, असा दावा या अधिकाऱ्याने केला. (वृत्तसंस्था)
अपहृत जखमी वर्मा यांची माहिती ‘ते सतत कमांडर साहिबच्या संपर्कात होते’
1 अपहरणकर्ते दहशतवादी सतत आपल्या ‘कमांडर साहिब’च्या संपर्कात होते आणि दर दहा मिनिटांनी त्याला फोन करीत होते, अशी माहिती एसपी सलविंदरसिंग यांचे सराफा व्यापारी मित्र राजेश वर्मा यांनी दिली. राजेश चार तासांच्या वर दहशतवाद्यांच्या तावडीत होते. यावेळी दहशतवाद्यांनी राजेश यांच्यावर चाकूने हल्ला केला होता. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
2 ‘संपूर्ण परिसरात शांतता असून आम्ही सहजपणे आमच्या लक्ष्यापर्यंत पोहचू शकतो, ’,अशी खात्री या दहशतवाद्यांनी त्यांच्या म्होरक्याशी बोलताना व्यक्त केली होती. ‘हमारा काम इंशाअल्ला फतेह हो जायेगा’ असे ते म्हणाले होते.
3 एसपींच्या गाडीत चालकाच्या बाजूला बसलेली व्यक्ती ‘मेजर साहिब’ होती आणि तो ‘कमांडर साहिब’शी सतत फोनवर बोलत होता. इतर दहशतवादी फारसे बोलत नव्हते आणि बोलले तरी उर्दुतून बोलायचे त्यामुळे ‘इंशाअल्ला’वगळता त्यांचे इतर बोलणे मला कळले नाही, असे वर्मा यांनी सांगितले.
4 दहशतवाद्यांनी जीपीएसचा वापर केला काय? असे विचारले असता वर्मा यांनी सांगितले की, एकदा ते आपल्या मार्गावरून भरकटले होते. मार्ग चुकला असल्याचे वाहनचालकाने लक्षात आणून दिले तेव्हा त्यांनी आपला जीपीएस सुरू केला होता आणि आम्ही नदीजवळ पोहोचलो असल्याने रस्ता बरोबर असल्याचे त्यांनी म्हटले होते.
5 वर्मा यांच्या सांगण्यानुसार ते रात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत हल्लेखोर दहशतवाद्यांच्या तावडीत होते. दहशतवाद्यांनी त्यांच्याजवळील २,००० रुपयेही हिसकावून घेतले होते. वर्मा यांच्या वॉलेटमध्ये आणखीही पैसे होते. पण त्यांनी सर्व पैसे घेतले नाहीत. सर्वांजवळ बॅकपॅक्स होत्या आणि त्या चांगल्याच जड असाव्यात. दहशतवादी पाच मोबाईलचा वापर करीत होते.
6 आपल्या लक्ष्याच्या जवळ पोहोचल्यावर दहशतवाद्यांनी गळा कापून मला ठार मारण्याचा प्रयत्न केला. एका ठिकाणी थांबल्यावर दोघे जण वाहनातून खाली उतरले आणि माझ्या पायावर बसलेल्या ‘अल्फा’ला त्यांनी मला मारण्याचा आदेश दिला. त्याक्षणी आता आपण संपलो याची जाणीव मला झाली होती.
7 दहशतवादी पुढे निघून गेल्याची खात्री झाल्यावर त्यांनी आपले बांधलेले पाय सोडवून घेतले. तब्बल अर्धा तास धावल्यानंतर त्यांना एक गुरुद्वारा दिसला.
तेथे वर्मा यांनी आश्रय घेतला. एसपींचा अंगरक्षक आणि दहशतवाद्यांदरम्यानचे बोलणे आपण ऐकले काय? असे विचारले असता होकारार्थी उत्तर देत ते म्हणाले, कुलविंदरचा फोन आला होता आणि तो एसपी साहीब कुठे आहेत? अशी विचारणा करीत असल्याचे मी ऐकले होते, असे वर्मा यांनी सांगितले.

Web Title: The terrorists had threatened to kill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.