दहशतवादी पाकमधून आल्याचे निष्पन्न
By admin | Published: July 29, 2015 01:58 AM2015-07-29T01:58:04+5:302015-07-29T01:58:04+5:30
संशयित लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी पाकिस्तानमधून आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या बामियाल गावातून भारतात घुसल्याचे पंजाबच्या गुरुदासपूर येथील सोमवारच्या
गुरुदासपूर : संशयित लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी पाकिस्तानमधून आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या बामियाल गावातून भारतात घुसल्याचे पंजाबच्या गुरुदासपूर येथील सोमवारच्या दहशतवादी हल्ल्याच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या दहशतवाद्यांजवळून हस्तगत करण्यात आलेला ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) या तपासात महत्त्वाचा धागा ठरण्याची शक्यता आहे. इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी जीपीएसचा वापर केला जातो. हे दहशतवादी जीपीएसच्या मदतीनेच गुरुदासपूर येथे दाखल झाल्याने ते नेमके कोठून आणि कोणत्या मार्गाने आले हे आता स्पष्ट होईल. हा जीपीएस फोरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. दरम्यान, दीनानगर पोलीस ठाण्याजवळच्या ज्या इमारतीत दहशतवाद्यांनी आश्रय घेतला होता, त्या इमारतीला फोरेन्सिक पथकाने चौकशीचा एक भाग म्हणून मंगळवारी भेट दिली. देवेंदर पाल सहगल आणि अश्विनी कुमार यांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यीय पथकाने या हल्ल्याच्या चौकशीला प्रारंभ केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दहशतवाद्यांजवळ अत्याधुनिक शस्त्रे होती आणि पोलिसांनी त्यांच्याजवळून चिनी बनावटीचे हातबॉम्ब आणि एके ४७ रायफल्स जप्त केल्या आहेत. हा हल्ला नियोजित असल्याचा दावा पोलिसांनी केला.
हे दहशतवादी जम्मू आणि पठाणकोटदरम्यानची कुंपण नसलेली सीमा अथवा चाक हिरा भागातून भारतात घुसल्याची शक्यता केंद्रीय गुप्तचर संस्थांनी व्यक्त केली आहे. दहशतवाद्यांची सिव्हिल लाईन भागातही हल्ला करण्याची योजना होती, असे तपासात स्पष्ट झाले आहे. दरम्यान हे दहशतवादी रावी नदीवरील धरण ओलांडून भारतात आल्याचे त्यांच्याजवळ सापडलेल्या जीपीएसवरून स्पष्ट झाले आहे. (वृत्तसंस्था)
शहीद बलजितसिंग यांच्या कुटुंबियांचा अंत्यसंस्कारास नकार
कपूरथळा : गुरुदासपूरच्या दीनानगर येथे सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधीक्षक बलजितसिंग यांच्या पुत्राला पोलीस अधीक्षकाचा दर्जा आणि दोन्ही कन्येला तहसीलदारपदाचे नियुक्तीपत्र मिळाल्यानंतरच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय बलजितसिंग यांच्या कुटुंबियांनी घेतला आहे.
‘माझे सासरे पोलीस निरीक्षक अच्छारसिंग यांच्या मृत्यूनंतर माझ्या पतीला नियुक्तीपत्र मिळण्यात अनेक अडचणी आल्या होत्या. माझ्या पतीला नियुक्तीपत्र मिळविण्यासाठी दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागली होती. हा अनुभव लक्षात घेऊनच आम्ही आधी नियुक्तपत्र आणि नंतर अंत्यसंस्कार करण्याची भूमिका घेतली आहे,’ असे बलजितसिंग यांची पत्नी कुलवंत कौर यांनी म्हटले आहे. बलजितसिंग यांचे वडील अच्छारसिंग हेही १९८४ मध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले होते.
सोमवारच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी आणि प्रत्येकी १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा पंजाब सरकारने केली आहे. बलजितसिंग यांच्या मागे पत्नी कुलवंत कौर, पुत्र मनिंदर सिंग (२४) आणि परमिंदर कौर (२२) व रविंदर कौर (२०) या दोन कन्या आहेत.