काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची आता टरकली, झाली पळता भुई थोडी : जेटली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2017 08:49 PM2017-08-13T20:49:51+5:302017-08-13T20:52:04+5:30
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे धाबे दणाणले असून काश्मीर घाटीतून आता दहशतवादी जीव मुठीत घेऊन पळू लागले आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री आणि संरक्षण मंत्री अरूण जेटली यांनी म्हटलं
नवी दिल्ली, दि. 13 - काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे धाबे दणाणले असून काश्मीर घाटीतून आता दहशतवादी जीव मुठीत घेऊन पळू लागले आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री आणि संरक्षण मंत्री अरूण जेटली यांनी म्हटलं आहे. दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सुरक्षादलाकडून काश्मीरमध्ये ऑपरेशन ऑल आउट सुरू आहे. रविवारी भारतीय लष्कराने हिजबूल मुजाहिद्दीनचा मुख्य कमांडर यासीन इत्तू याच्यासह अन्य तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना जेटली म्हणाले, दहशतवाद्यांचा संपूर्ण खात्मा करणं ही केंद्राची प्राथमिकता आहे. सैन्यदल आणि राष्ट्रीय तपास यंत्रणांमुळे दहशतावद्यांवर दबाव वाढतो आहे.कोणताही दहशतवादी आता जास्त काळ जगू शकत नाही, तसंच दहशत पसरविण्याचा विचारही करू शकत नाही. राष्ट्रीय तपास यंत्रणा, जम्मू काश्मीर पोलीस आणि सैन्य दल या सगळ्यांचं हे यश आहे. या सगळ्यांनी अत्यंत मेहनत घेऊन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे दहशतवाद्यांचे धाबे दणाणले आहेत असं जेटली म्हणाले.
काश्मीर खोऱ्यात दहशत पसरविण्याचे काम पाकिस्तानकडून सातत्यानं होत असतं. पाकिस्तानला काहीही करून काश्मीरवर कब्जा मिळवायचा आहे मात्र त्यांचा हा मनसुबा कधीच पूर्ण होऊ शकत नाही असंही जेटली यांनी स्पष्ट केलं. तसंच काश्मीर खोऱ्यात आता मोजकेच दहशतवादी उरले आहेत आणि ते जीव मुठीत घेऊन पलायन करत आहेत असंही जेटली यांनी स्पष्ट केलं.
यावेळी बोलताना जेटलींनी चीन आणि डोकलाम सीमेवरून निर्माण झालेल्या संघर्षाचा उल्लेख केला नाही.
शोपियाँ येथील चकमकीत महाराष्ट्रातील जवान सुमेध गवई यांना वीरमरण -
जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये कालपासून सुरू असलेल्या चकमकीत महाराष्ट्रातील जवान सुमेध वामन गवई यांना वीरमरण आले आहे. गवई हे अकोला जिल्ह्यातील लोणाग्रा गावचे सुपुत्र होते. या चकमकीमध्ये गवई यांच्यासह अन्य एका जवानाला वीरमरण आले आहे. तर तीन जवान जखमी झाले आहेत. या चकमकीदरम्यान लष्कराने एका दहशतवाद्यालाही ठार मारले आहे.
सुमेध गवई हे चार वर्षांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झाले होते. लोणाग्रा येथे त्यांचे आई-वडील, बहीण राहतात. त्यांचा लहान भाऊही लष्करात आहे. एक ऑगस्ट रोजीच त्यांचा वाढदिवस होता. लवकरच ते सुटीवर गावी येणार होते, असे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. दरम्यान, त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शोपियन जिल्ह्यातील अवनीरा गावात शनिवारी संध्याकाळच्या सुमारास दहशतवादी आणि लष्कराचे जवान यांच्यात चकमक झाली. या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले असून तीन जवान जखमी झाले आहेत. दरम्यान, लष्काराच्या जवानांनी परिसरात नाकाबंदी केली आहे. तसेच, दहशतवाद्यांचा शोध घेणे सुरु आहे. तर, दुसरीकडे कुपवाडा परिसरात सुद्धा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक जखमी झाला आहे.