दहशतवादी अबु दुजाना ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 04:59 AM2017-08-02T04:59:35+5:302017-08-02T04:59:39+5:30
अमरनाथ यात्रेवर झालेल्या हल्ल्याची आखणी करणारा लष्कर-ए-तैयबाचा काश्मीरमधील प्रमुख अबु दुजाना आणि त्याचा साथीदार मंगळवारी सकाळी पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या कारवाईत ठार झाले.
श्रीनगर : अमरनाथ यात्रेवर झालेल्या हल्ल्याची आखणी करणारा लष्कर-ए-तैयबाचा काश्मीरमधील प्रमुख अबु दुजाना आणि त्याचा साथीदार मंगळवारी सकाळी पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या कारवाईत ठार झाले.
अबु दुजाना हा पाकिस्तानी नागरिक असून, तो २0१0 साली काश्मीरमध्ये आला आणि उत्तर काश्मीरमध्ये त्याने नेटवर्क उभारले. गेल्या वर्षी जुलैमध्ये लष्करी कारवाईत बुरहान वणी ठार झाल्यानंतर अबु दुजानाकडे संघटनेची सूत्रे होती. त्याच्या अटकेसाठी १५ लाख रुपयांचे बक्षीस लावण्यात आले होते. सुरक्षा दले गेले अनेक महिने त्याच्या शोधात होती. मध्यंतरी पळून जाताना तो स्वत:चा मोबाइल कारमध्ये विसरून गेला. तो सुरक्षा दलाच्या हातात लागल्यामुळे त्याची माहिती मिळवणे सुरू केले होते. सोमवारी मध्यरात्रीनंतर तो पत्नीला भेटण्यासाठी पुलवामा जिल्ह्याच्या हाकरीपोरा गावातील घरी आल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी त्या घराला घेरले. त्याला पहाटे साडेचार वाजता बाहेर येण्याचे आवाहन करण्यात आले. पण तो येत नव्हता. अखेर सकाळी साडेनऊ वाजता लष्कराने घरावर रॉकेट लाँचर डागले.