लखनऊमधील दहशतवादी इसिसनेच प्रेरित- पोलीस
By admin | Published: March 8, 2017 10:40 PM2017-03-08T22:40:35+5:302017-03-08T22:40:35+5:30
सैफुल्लासह संशयित दहशतवाद्यांचा इसिसशी संबंध नसल्याचं उत्तर प्रदेशचे अतिरिक्त महासंचालक दलजित चौधरी यांनी सांगितलं आहे.
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 8 - उत्तर प्रदेशात संशयित दहशतवाद्यांना पकडलं असून, लखनऊमध्ये दहशतवादी सैफुल्लाचाही एटीएसनं खात्मा केला आहे. त्यानंतर सैफुल्लासह संशयित दहशतवाद्यांचा इसिसशी संबंध नसल्याचं उत्तर प्रदेशचे अतिरिक्त महासंचालक दलजित चौधरी यांनी सांगितलं आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती उघड केली आहे.
दलजित चौधरी म्हणाले, सर्व संशयित दहशतवाद्यांची दिशाभूल करण्यात आली होती. त्यांना बाहेरून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नव्हती. संशयित दहशतवादी सोशल मीडियाच्या माध्यमातून इसिसचे साहित्य वाचत होते आणि त्यामुळेच ते प्रभावित झाले. आमच्याकडे त्यांचा इसिसशी संबंध असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. मात्र दहशतवादी हे इसिसचं साहित्य वाचत असून, त्यापासून ते प्रेरित झाले होते. तसेच ते स्वतःचं मॉड्युल बनवण्यासाठी प्रयत्नशील होते. सैफुल्लाला भाऊ आणि शेजा-यांच्या मदतीनं आत्मसमर्पण करण्याचा सल्ला दिला होता. मात्र आत्मसमर्पण करण्यास त्यानं नकार दिला. त्यानंतर आम्हाला सैफुल्लाच्या खोलीत प्रवेश करावा लागला आणि गोळीबारात तो ठार झाला. सैफुल्लाजवळ तीन पासपोर्ट सापडले आहेत. एका पासपोर्टमध्ये सैफुल्लाच्या कानपुरातल्या मनोहर नगरातला पत्ता दिला आहे. याच पत्त्यावर सैफुल्लाचं कुटुंब राहतं.
संशयित दहशतवादी हे नवशिखे असल्याचं आम्ही म्हणणार नाही. यातील काही दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट केले आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून हे संशयित दहशतवादी इसिसचं साहित्य वाचत असून, त्यापासून त्यांनी बॉम्ब बनवण्याचा अभ्यास करत होते. लखनऊमध्ये हे चार जण गेल्या काही दिवसांपासून भाड्यानं राहत होते. तसेच इतर ठिकाणांची ते रेकीही करत होते. या दहशतवाद्यांनीच भोपाळ पॅसेंजरमध्ये आयडी बॉम्बस्फोट घडवला होता. त्यानंतर तीन संशयितांना ताब्यातही घेण्यात आलं होतं. सैफुल्लाचाही गोळीबारात मृत्यू झाला आहे. सैफुल्लाच्या खोलीत 32 बोअरची 8 पिस्तूल, 630 काडतुसं, 4 चाकू, कंपास, क्लाक टायमर, ड्राय सेल, पाइप, मोटारसायकल, 6 मोबाइल फोन, 4 सिम, 45 ग्रॅम सोनं, लॅपटॉप जप्त करण्यात आलं आहे. तसेच सैफुल्लाजवळ मोठ्या प्रमाणात पैसेही सापडले आहेत. त्यात विदेशी चलनाचाही समावेश आहे, अशी माहितीही उत्तर प्रदेशचे अतिरिक्त महासंचालक दलजित चौधरी यांनी दिली आहे.
We have no such evidence yet of any #ISIS link: Daljit Chaudhary,ADG on #LucknowTerrorOppic.twitter.com/kMHQuifJIr
— ANI UP (@ANINewsUP) March 8, 2017