'घराबाहेर पडाल तर...', हिजबुलची काश्मीर खोऱ्यात धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 08:49 AM2019-08-31T08:49:30+5:302019-08-31T09:07:01+5:30
हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्यावतीने एक पत्रक जारी करण्यात आले आहे.
श्रीनगर: राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. मात्र, आता येथील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. यातच काश्मीर खोऱ्यातील लोकांना दहशतवाद्यांनी धमकी दिली आहे. येथील स्थानिक नागरिक, दुकानदार आणि टॅक्सी चालकांना दहशतवाद्यांनी धमकी दिली आहे.
हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्यावतीने एक पत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यातील दुकानदारांना दुकाने उघडी न ठेवण्याची आणि टॅक्सी चालकांना टॅक्सी न चालवण्याची धमकी दिली आहे. याशिवाय, येथील स्थानिक नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याची धमकी दिली आहे. याचबरोबर, येथील शाळांना सुद्धा दहशतवाद्यांनी इशारा दिला आहे. कुठल्याही रस्त्यावर मुली शाळेत जाताना दिसता कामा नये, अन्यथा त्यांना धोक्याचा सामना करावा लागेल, असे दहशतवाद्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधीलकलम 370 रद्द केल्यानंतर दहशतवादी आणखीनच सैरभैर झाले आहेत. त्यामुळे दहशतवादी जम्मू काश्मीरमधील स्थिती बिघडवण्याच्या तयारीत आहेत. सध्या दहशतवाद्यांकडून सामान्य नागरिकांना लक्ष केले जात आहे. गुरुवारी दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील एका दुकानदारावर गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळीबारात दुकानदाराचा मृत्यू झाला. गुलाम मोहम्मद असे या दुकानदाराचे नाव होते.
दुसरीकडे, पाकिस्तानकडून भारतामध्ये कुरापती करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. काश्मीर खोऱ्यातील शांतता बिघडविण्यासाठी पाकचे दहशतवादी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सरकारला प्राप्त झाली आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये भारतीय लष्कर, हवाई दल आणि सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
पाकिस्तानी दहशतवादी समुद्रमार्गे घुसखोरीच्या तयारीत, गुजरातमध्ये हाय अलर्ट जारी
गेल्या काही दिवसांपूर्वी गुजरातच्या कांडलामध्ये कच्छ मार्गे पाकिस्तानी कमांडो किंवा दहशतवादी भारतामध्ये घुसखोरी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणांना याबाबतची माहिती मिळाली आहे. त्यामुळे गुजरातमधील सर्व बंदरांवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी कमांडो समुद्रमार्गे भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. गुप्तचर यंत्रणांना याबाबत माहिती मिळताच बॉर्डर सिक्योरिटी फोर्स, इंडियन कोस्ट गार्ड यांनी हाय अलर्ट जारी केला आहे. समुद्र मार्गे भारतात येऊन दहशतवादी हल्ला करणार असल्याची माहिती मिळत आहे.