'अवघ्या 90 सेकंदात उद्ध्वस्त केले दहशतवादी तळ; भारताने शिकविला पाकला धडा'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 01:27 PM2019-06-25T13:27:33+5:302019-06-25T13:28:01+5:30
26 फेब्रुवारीच्या रात्री आम्ही मिराज 2000 या विमानात स्पाइस 2000 मिलाइल बॉम्ब भरुन लोड केलं होतं. मिसाईलमध्ये टार्गेट कोड फिड केला. त्या रात्री 2 च्या दरम्यान आम्ही उड्डाण घेतलं होतं.
नवी दिल्ली - 26 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालकोट भागात घुसून दहशतवादी तळांना टार्गेट केले होते. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या तळांना भारताने क्षणार्धात उद्ध्वस्त केले. या भारतीय हवाई दलाच्या मिशनमध्ये सहभागी असणाऱ्या दोन पायलटने एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, अवघ्या 90 सेकंदामध्ये त्यांनी लक्ष्य साध्य केलं.तसेच मिशनची गोपनीयता असल्याने त्यांच्या कुटुंबालाही याची कल्पना नव्हती.
गेल्या 48 वर्षामध्ये पहिल्यांदाच भारतीय हवाई दलाने पाकच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करत बालकोटमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केलं. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने ही कारवाई केली होती. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते.
भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईकसाठी मिराज-2000 या विमानांचा उपयोग केला होता. हिंदूस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार या मिशनमध्ये सहभागी असणाऱ्या एका पायलटने 90 सेकंदात आपलं लक्ष्य साध्य करत दहशतवाद्यांच्या तळावर मिसाईल डागली. या ऑपरेशनची माहिती खूप कमी जणांना देण्यात आली होती. एअर स्ट्राईकच्या दिवशी जेव्हा टीव्हीवर या बातम्या येऊ लागल्या तेव्हा पायलटच्या पत्नीने तुम्ही या मिशनमध्ये होता का? असं विचारलं असता त्याला काहीच उत्तर न देता पुन्हा झोपी गेलो असं पायलटने सांगितले.
मिशनमध्ये सहभागी असणाऱ्या दुसऱ्या पायलटने सांगितले की, आम्ही खूप साऱ्या कॉम्बेट एअर पेट्रोलसह नियंत्रण रेषेवरुन उड्डाण घेतलं. एलओसीवर एकाच वेळी कॉम्बेट एअर पेट्रोल उडविण्यामागे पाकिस्तानच्या हवाई सुरक्षेला चकमा देणं हे उद्दिष्ट होतं. एअर स्ट्राईकच्या दोन दिवस आधीपर्यंत या मिशनची माहिती कोणालाच नव्हती. आम्हाला काहीतरी होणार एवढं माहित होतं पण नक्की काय होईल याची कल्पना नव्हती असं पायलटने सांगितले.
26 फेब्रुवारीच्या रात्री आम्ही मिराज 2000 या विमानात स्पाइस 2000 मिलाइल बॉम्बने लोड केलं होतं. मिसाईलमध्ये टार्गेट कोड फिड केला. त्या रात्री 2 च्या दरम्यान आम्ही उड्डाण घेतलं होतं. पाकिस्तानला चकमा देण्यासाठी सुखोई 30 एमकेआय तैनात करण्यात आलं होतं. हल्ल्यानंतर फोटो घेण्यासाठी हेरोन ड्रोन सज्ज होतं. आम्ही देशाच्या पूर्वेकडून उड्डाण घेत काश्मीरला पोहचलो. तिथे पोहचल्यानंतर आम्ही रेडिओ बंद केला. आमच्या आजूबाजूला कोणतंही पाकिस्तानचं लढाऊ विमान नव्हतं हे महत्वाचं होतं. मिसाईलने आपलं काम केलं. आम्ही शत्रूंना टार्गेट केलं अशी माहिती पायलटने दिली.