दहशतवादी फक्त पुलवामा घडवून थांबणार नव्हते; पुढील हल्ल्याचीही तयारी झाली होती; पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 08:29 AM2020-08-26T08:29:45+5:302020-08-26T08:30:35+5:30

एनआयएच्या आरोपपत्रातून महत्त्वाची माहिती समोर

terrorists Were Planning Second Attack After Pulwama but cancelled it after Balakot Strike | दहशतवादी फक्त पुलवामा घडवून थांबणार नव्हते; पुढील हल्ल्याचीही तयारी झाली होती; पण...

दहशतवादी फक्त पुलवामा घडवून थांबणार नव्हते; पुढील हल्ल्याचीही तयारी झाली होती; पण...

Next

जम्मू: गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात जम्मू-काश्मीरमधील पुलवामात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर हल्ला झाला. त्यात ४० जवानांचा मृत्यू झाला. या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आरोपपत्र दाखल केलं आहे. त्या हल्ल्यानंतर दहशतवादी थांबणार नव्हते. पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरसह इतर दहशतवादी दुसऱ्या हल्ल्याच्या तयारीत होते. त्यासाठी त्यांनी कारचीदेखील व्यवस्था केली होती. मात्र भारतीय हवाई दलानं बालाकोटवर एअर स्ट्राईक केला. 

भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राईकमुळे जैश-ए-मोहम्मदचं नुकसान झालं. जैशचा दहशतवादी तळ एअर स्ट्राईकमध्ये उद्ध्वस्त झाला. भारतानं घेतलेला आक्रमक पवित्रा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेला दबाव यामुळे पाकिस्तानची कोंडी झाली. त्यामुळेच जैशला दुसरा दहशतवादी हल्ला घडवून आणता आला नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मसूद अजहरनं एअर स्ट्राईकनंतर लगेचच दुसरा हल्ला रोखण्याचे आदेश दिले. मसूद अजहरचा भाचा उमर फारूक दुसऱ्या हल्ल्याच्या तयारीत होता. पण मसूदनं त्याला हल्ला रोखण्याच्या सूचना केल्या. पुलवामा हल्ल्यानंतर दीड महिन्यातच एका एन्काऊंटरमध्ये उमर फारूक मारला गेला.

पुलवामा हल्ला प्रकरणी काल एनआयएनं आरोपपत्र दाखल केलं. त्यात मसूद अजहर आणि त्याचा भाऊ अब्दुल रौफ असगरची नावांचा प्रमुख आरोपी म्हणून उल्लेख आहे. याशिवाय आरोपपत्रात मोहम्मद उमर फारूक, आत्मघाती हल्लेखोर आदिल अहमद दार आणि पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या अन्य दहशतवादी कमांडर्सचीदेखील नावं आहेत. या प्रकरणी आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली आहे. या सगळ्यांविरोधात पुरेसे पुरावे असल्याची माहिती एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. पुराव्यांमध्ये चॅट, कॉल्स यासारखे पुरावे असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

मसूद अजहरचा भाचा उमर फारूक एप्रिल २०१८ मध्ये जम्मू-सांबा सेक्टरमधील सीमा ओलांडून भारतात आला होता. तो पुलवाम्यात जैशचा कमांडर होता. एनआयएतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमर फारूक आणि त्याच्या सहकाऱ्यांनीच सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्याची योजना आखली होती. या हल्ल्यात ४० जवानांना वीरमरण आलं.
 

Read in English

Web Title: terrorists Were Planning Second Attack After Pulwama but cancelled it after Balakot Strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.