एलटीटीईप्रमाणे काश्मीरमध्येही दहशतवाद्यांचा पाडाव होईल; राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 12:31 AM2018-10-08T00:31:35+5:302018-10-08T00:32:12+5:30
जवळजवळ बारा देशांचा पाठिंबा असूनही श्रीलंकेत एलटीटीईला आपले उद्दिष्ट साध्य करता आले नाही, तर मग काश्मीरमध्ये कमी संख्येने असलेल्या दहशतवाद्यांना ते कसे शक्य होईल, असे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे.
श्रीनगर : जवळजवळ बारा देशांचा पाठिंबा असूनही श्रीलंकेत एलटीटीईला आपले उद्दिष्ट साध्य करता आले नाही, तर मग काश्मीरमध्ये कमी संख्येने असलेल्या दहशतवाद्यांना ते कसे शक्य होईल, असे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानच्या पाठिंब्याने काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरू आहेत असे सांगून ते म्हणाले की, दगडफेक करणे हा काश्मीरमधील काही युवकांचा पूरक उद्योग झाला आहे. हे काम करणाऱ्या प्रत्येक तरुणाला दिवसाला पाचशे रुपये देण्यात येतात. या राज्यात होत असलेल्या हिंसक प्रकारांना पाकिस्तान, फुटीरवादी, काँग्रेस
व नॅशनल कॉन्फरन्स जबाबदार
आहे.
या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर नॅशनल कॉन्फरन्स व पीडीपीने बहिष्कार घातला. त्याबाबत ते म्हणाले की, त्यामागे त्यांच्या अडचणी असतील; पण हे दोन्ही पक्ष आता
विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवून आहेत.
राजकारण्यांविषयी निर्माण झाला अविश्वास
मलिक म्हणाले की, वाजपेयी व मोदी यांची सरकारे वगळता मुख्य प्रवाहातील राजकीय नेत्यांच्या चुकीच्या भूमिकांमुळेही काश्मीरचा प्रश्न चिघळला आहे. मुफ्ती मोहम्मद सईद, मेहबूबा मुफ्तींनी काश्मिरींना खोटी आशा दाखविली. हे राजकारणी दिल्लीत जाऊन एक बोलतात व राज्यात वेगळेच बोलतात. त्यामुळे युवकांच्या मनात राजकारण्यांविषयी अविश्वास निर्माण झाला आहे.