जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 08:58 AM2024-11-28T08:58:51+5:302024-11-28T08:59:56+5:30

जम्मू विभागात वाढत्या दहशतवादी कारवाया आणि हल्ले पाहता केंद्रीय गृह मंत्रालयाने जम्मूमध्ये राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांसाठी कायमस्वरूपी केंद्र स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.

Terrorists will be eradicated in the valley of Jammu and Kashmir; Ministry of Home Affairs approves permanent deployment of NSG commandos | जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी

जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी

जम्मू विभागातील वाढत्या दहशतवादी कारवाया आणि हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने जम्मूमध्ये राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG)साठी कायमस्वरूपी केंद्र स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. एनएसजीचे तीन ते चार घटक या केंद्रात कायमस्वरुपी तैनात केले जातील. एनएसजीने जम्मू शहराच्या विविध भागात तसेच बाहेरील भागात उंच इमारती, सुरक्षा आस्थापना आणि संवेदनशील सार्वजनिक ठिकाणांचे सुरक्षा ऑडिट करून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे.

कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा

केंद्राच्या या निर्णयामुळे आता जम्मू आणि आसपासच्या भागात विशेष गजबजलेल्या भागात दहशतवादी हल्ले आणि अशा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी एनएसजीला दिल्ली किंवा चंदीगडहून पाचारण करावे लागणार नाही. आतापर्यंत, २०१८ पासून जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये NSG कायमस्वरूपी तैनात करण्यात आले होते. हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या सूचनेनुसार करण्यात आले होते.

अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, गेल्या काही वर्षांत जम्मू विभागात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. जम्मू शहरात दहशतवाद्यांकडून मोठा हल्ला होण्याची शक्यताही गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. गुप्तचर यंत्रणांच्या अहवालाच्या आधारेच केंद्रीय गृहमंत्रालयाने जम्मूमध्ये एनएसजीचे कायमस्वरूपी केंद्र मंजूर केले आहे. NSG जवानांचा एक गट आता कायमस्वरूपी जम्मूमध्ये उपस्थित राहणार आहे.

जम्मूमध्ये एनएसजीच्या तैनातीबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीर पोलिसांनी जम्मू-काश्मीरसाठी तयार केलेल्या दहशतवादविरोधी कृती योजनेअंतर्गत एनएसजी कमांडोची तैनाती करण्यात आली आहे. पण एनएसजी कमांडोच्या तैनातीचा अर्थ असा होऊ नये की आता फक्त एनएसजी जम्मू आणि त्याच्या आसपासच्या भागात दहशतवादविरोधी कारवायांची जबाबदारी घेईल. ही जबाबदारी फक्त जम्मू आणि काश्मीर पोलिसांवर आहे आणि ते आणि त्यांची दहशतवादविरोधी पथके दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत मोठी भूमिका बजावतील.

पर्यटकांना आता सियाचीन, कारगिल आणि गलवान या युद्धक्षेत्रांनाही भेट देता येणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी लष्कर मोठा पुढाकार घेणार आहे. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी बुधवारी सांगितले की, आम्ही पर्यटकांना सियाचीन ग्लेशियर, कारगिल आणि गलवान व्हॅलीच्या हिमशिखरांना भेट देण्याचे ठरवले आहे, जेणेकरून त्यांना या दुर्गम युद्धभूमींचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल.

जम्मू-काश्मीरमधील प्रबळ थीम दहशतवादापासून पर्यटनात बदलली आहे आणि लष्कराने हा बदल घडवून आणला आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या संरक्षण आणि धोरणात्मक अभ्यास विभागातर्फे आयोजित व्याख्यानमालेला संबोधित करताना जनरल द्विवेदी म्हणाले की, जम्मू-काश्मीरच्या पर्यटन क्षेत्रात प्रचंड क्षमता आहे.

जम्मू-काश्मीरला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी ४८ क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. या दिशेने उचललेल्या पावलांमुळे येत्या पाच वर्षांत पर्यटकांची संख्या दुप्पट करण्याची क्षमता आहे.

Web Title: Terrorists will be eradicated in the valley of Jammu and Kashmir; Ministry of Home Affairs approves permanent deployment of NSG commandos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.