5G In India: भारतामध्ये ५जी कॉलची चाचणी पूर्ण, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला पहिला ५जी कॉल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 11:03 PM2022-05-19T23:03:30+5:302022-05-19T23:04:07+5:30
5G In India: भारतामध्ये ५जी कॉलची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. याची चाचणी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आयआयटी मद्रासमध्ये व्हिडीओ कॉल लावून केली.
चेन्नई - भारतामध्ये ५जी कॉलची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. याची चाचणी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आयआयटी मद्रासमध्ये व्हिडीओ कॉल लावून केली. अश्विनी वैष्णव यांनी ५जी व्हाईस कॉल आणि व्हिडीओ कॉल करून या सेवेचे परीक्षण केले. या तंत्रज्ञानाचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण नेटवर्क भारतामध्ये विकसित करण्यात आलं आहे.
हे परीक्षण केल्यानंतर अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात त्यांनी सांगितले की, आयआयटी मद्रासमध्ये ५जी कॉलचं यशस्वीरीत्या परीक्षण करण्यात आलं. संपूर्ण एंड टू एंड नेटवर्क भारतामध्ये डिझाइन आणि विकसित करण्यात आलं आहे.
अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी सांगितले होते की, यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत भारताचं स्वत:चं ५जी स्ट्रक्चर तयार होणार आहे. अशा परिस्थितीत आज याची यशस्वी चाचणी होणे भारतासाठी गर्वाची बाब आहे. हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २२० कोटींहून अधिकचा खर्च झाला आहे.