राष्ट्रवादीसह स्वाभिमानी व जनसुराज्यची कसोटी

By admin | Published: September 24, 2014 04:18 AM2014-09-24T04:18:59+5:302014-09-24T04:18:59+5:30

निवडणूक विधानसभेची असली तरी कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेससह स्वाभिमानी शेतकरी संघटना व जनसुराज्य शक्ती या पक्षाची या निवडणुकीत कसोटी लागणार आहे

Testing of Swabhimani and Janasurajya with NCP | राष्ट्रवादीसह स्वाभिमानी व जनसुराज्यची कसोटी

राष्ट्रवादीसह स्वाभिमानी व जनसुराज्यची कसोटी

Next

निवडणूक विधानसभेची असली तरी कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेससह स्वाभिमानी शेतकरी संघटना व जनसुराज्य शक्ती या पक्षाची या निवडणुकीत कसोटी लागणार आहे. विधानसभेच्या १० जागांपैकी राष्ट्रवादीकडे तीन आहेत. कोल्हापूर हा एकेकाळी ‘राष्ट्रवादीचा गड’ मानला जाई. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या पुणे जिल्ह्यातही जेवढी नव्हती तेवढी कोल्हापूरमध्ये या पक्षाची एकेकाळी ताकद होती. परंतु तो आता इतिहास झाला असून, आता लढवत असलेल्या तीन जागा राखण्याचे आव्हान या पक्षासमोर आहे. शरद पवार, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्यासह काँग्रेसचे कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढविलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनाही लोकसभेतील यशाची विधानसभेत पुनरावृत्ती करायची आहे. लोक शेट्टी यांनाच विजयी करतात की त्यांच्या विचारांनाही बळ देतात, हे त्यावरून ठरणार आहे. १० वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात नवे काही घडवून आणण्याची शपथ घेऊन उतरलेल्या आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षासमोर तर अस्तित्वाचीच लढाई आहे.
कोल्हापूर हा तसा राजकीयदृष्ट्या अत्यंत जागरूक व संवदेनशील जिल्हा. उत्तम शेती, हिरवेगार उसाचे मळे, पांढऱ्या शुभ्र कणीदार दुधाचा महापूर, औद्योगिक नगरी आणि अलीकडील चार वर्षांत टोल आंदोलनामुळे राज्यातच नव्हे, तर देशात गाजत असलेला हा जिल्हा. इथला माणूस जेवढा स्वाभिमानी तेवढाच इरेबाज. त्याला कुणी आव्हान दिलेले आवडत नाही. मग तो भल्या भल्यांची उतरवतो. ही या जिल्ह्याच्या राजकारणाची प्रवृत्ती. त्यामुळेच आजपर्यंत या जिल्ह्यावर कुणा एका पक्षाचेच राज्य कधीच चालले नाही़ तसा मूळ काँग्रेसचा विचार मानणारा जिल्हा असला तरी तो जास्त करून विरोधकांचाच जिल्हा राहिला आहे. आताही दहापैकी निम्म्या जागा विरोधी पक्षांच्याच ताब्यात आहेत. त्यात काँग्रेस किंवा शिवसेनेची एखादी जागा वाढू शकते, परंतु त्यापेक्षा जास्त निकाल बदलण्याची चिन्हे आता तरी दिसत नाहीत. काँग्रेस ७ जागा लढवत आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील व सा. रे. पाटील हे विद्यमान आमदार आहेत. ९३ वर्षांचे सा. रे. पाटील पुन्हा नव्याने रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. गृहराज्यमंत्र्यांना पारंपरिक विरोधक आमदार महादेवराव महाडिक गटाशी झुंज द्यावी लागण्याची चिन्हे आहेत. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांची लढत शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्याशी होत आहे. विलासराव देशमुख यांच्या पुण्याईमुळे लातूरला जावून १५ दिवसांत खासदार झालेले जयवंतराव आवळे पुन्हा रिंगणात उतरणार आहेत. राष्ट्रवादी तीन जागा लढवत आहे. जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांना कागल मतदारसंघात शिवसेनेच्या संजय घाटगे यांनी आव्हान दिले आहे. तिथे घाटगे हे माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांना सोबत व शिवसेनेचा झेंडा घेऊन मैदानात उतरल्याने लढतीत रंग भरला आहे. जिल्हाध्यक्ष आमदार के. पी. पाटील यांचे भवितव्य विरोधात किती उमेदवार राहतात यावर ठरणार आहे. चंदगडला आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या घरातच संघर्ष आहे.

Web Title: Testing of Swabhimani and Janasurajya with NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.