सीरम इन्स्टिट्यूटला फटका, कोवोवॅक्सच्या चाचण्यांस परवानगी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 05:55 AM2021-07-02T05:55:18+5:302021-07-02T05:55:49+5:30
केंद्र सरकार; सीरम इन्स्टिट्यूटला फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : २ ते १७ वर्षे वयाच्या मुलांवर कोवोवॅक्स लसीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या करण्यास सीरम इन्स्टिट्यूटला केंद्र सरकारच्या अखत्यारीतील केंद्रीय औषध दर्जा नियंत्रण संस्थेच्या (सीडीएससीओ) तज्ज्ञ समितीने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे या कंपनीला मोठा फटका बसला आहे.
देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची व त्यात लहान मुलांना सर्वात जास्त धोका असण्याची शक्यता काही जणांनी वर्तविली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही घटना महत्त्वपूर्ण ठरते. भारतामध्ये १० ठिकाणी २ ते ११ वर्षे व १२ ते १७ वर्षे या दोन वयोगटांतील मिळून ९२० मुलांवर कोवोवॅक्सच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या करण्याची परवानगी सीरम इन्स्टिट्यूटने औषध महानियंत्रकांकडे सोमवारी मागितली होती. मात्र ती विनंती सीडीएससीओच्या तज्ज्ञ समितीने अमान्य केली. कोवोवॅक्सच्या सध्या प्रौढ व्यक्तींवर चाचण्या सुरू आहेत. ही लस सुरक्षित असल्याचा या चाचण्यांमधील अहवाल प्रथम सादर करा. त्यानंतरच कोवोवॅक्स लसीच्या लहान मुलांवरील चाचण्यांना परवानगी द्यायची की नाही, याचा विचार करता येईल, असेही या समितीने म्हटले आहे.