कोरोनामुळे अनाथ झालेल्यांना पाठ्यवृत्ती; २३ व्या वर्षी १० लाख, पंतप्रधानांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 06:47 AM2022-05-31T06:47:42+5:302022-05-31T06:47:56+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ही घोषणा केली.
नवी दिल्ली : कोरोना साथीच्या काळात पालक गमावलेल्या मुलांना ‘प्राइम मिनिस्टर केअर फॉर चिल्ड्रन’ या योजनेतून १८ ते २३ वर्षे वयापर्यंत दर महिना चार हजार रुपये पाठ्यवृत्ती दिली जाणार आहे. अशा मुलांना वयाच्या २३व्या वर्षी १० लाख रुपये देण्यात येतील. त्यांच्या उच्च शिक्षणासाठी केंद्र सरकार कर्जही उपलब्ध करून देणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ही घोषणा केली. कोरोना साथीत पालक गमावलेल्या मुलांना वैद्यकीय उपचारांसाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही. त्यांना केंद्र सरकार आयुष्यमान कार्ड देणार आहे. त्यातून ५ लाख रुपयांपर्यंत उपचारांसाठी खर्च करता येतील.
कोरोना साथीचे सामाजिक, आर्थिक असे दुहेरी विपरित परिणाम समाजातील प्रत्येक घटकांवर झालेले दिसून येत आहेत. या संसर्गाने झालेल्या मृत्यूंमुळे अनेक घरांमध्ये कमावती माणसे हरपली आहेत. पालक गमावल्यामुळे मुले अनाथ झाली. लहान मुले ही देशाचे भविष्य आहेत, त्यामुळे त्यांची काळजी घेणे, हे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.
काय आहेत ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रन’ची वैशिष्ट्ये ?
अनाथ मुलांना घराजवळच्या सरकारी शाळांत प्रवेश दिला जाईल. ते खासगी शाळेत शिकत असतील तर तिथे भरलेली फी शिक्षणाचा हक्क योजनेतील तरतुदीद्वारे त्यांना परत करण्यात येईल. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, नेताजी सुभाषचंद्र बोस, जवाहर नवोदय निवासी विद्यालयांमध्ये या मुलांना सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाणार आहे. पहिली ते बारावी इयत्तेपर्यंत या मुलांना दरवर्षी २० हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येईल. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक कर्ज मिळणार आहे.
समुपदेशनासाठी विशेष हेल्पलाईन
या मुलांच्या पाठीशी प्रत्येक भारतीय नागरिक आहे, ही भावना प्राइम मिनिस्टर केअर फॉर चिल्ड्रन योजनेमुळे प्रबळ होईल. अनाथ झालेल्या मुलांच्या समुपदेशनासाठी केंद्र सरकारने एक हेल्पलाइन सुरू केली आहे.