ठाकरे गटाचे टेन्शन वाढले; मशाल चिन्हावरही दावा, सर्वोच्च न्यायालयात जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 11:57 AM2023-01-12T11:57:23+5:302023-01-12T11:58:00+5:30
शिवसेनेला यापूर्वी निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या मशाल चिन्हावरही दावा करण्यात आला आहे.
नवी दिल्ली - धनुष्यबाण कोणाचा यावर दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. आता पुढच्या वर्षी म्हणजेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पुढील सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर शिवसेनेतील ठाकरे आणि शिंदे गटाने दावा सांगितला आहे. याची सुनावणी मुख्य निवडणूक आयुक्तांसमोर सुरू आहे. त्यातच, आता शिवसेनेला यापूर्वी निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या मशाल चिन्हावरही दावा करण्यात आला आहे. त्यामुळे, शिवसेना ठाकरे गटाचे टेन्शन वाढले आहे. समता पार्टीने हा दावा केला असून ते आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.
शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या हक्काबाबात सोमवारी झालेल्या सुनावणीत केवळ पाच ते सात मिनिटांत दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आयुक्तांनी सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलली आहे. त्यातच, ठाकरे गटाला दिलेल्या मशाल चिन्हाबाबत पुन्हा वाद सुरू झाला असून समता पार्टी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. मशाल चिन्हावर अजूनही समता पार्टीचाच दावा असल्याचे समता पार्टीने म्हटले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल चिन्ह दिल्याने समता पार्टीचा आक्षेप होता. याप्रकरणी येत्या 2 दिवसात ते सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.
अंधरे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवेळी शिवसेना पक्षाच्या चिन्हा ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी दावा केला होता. त्यामुळे, आयोगाने हे चिन्ह गोठवलं. त्यानंतर, दोन्ही पक्षांकडून तीन चिन्हांचा पर्याय मागविण्यात आला होता, त्यापैकी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मशाल हे चिन्ह निश्चित करण्यात आलं. तर, शिवसेना शिंदे गटाला ढाल आणि तलवार हे चिन्ह देण्यात आलं आहे. मात्र, शिवसेनेला मिळालेल्या मशाल या चिन्हावर समता पार्टीने त्याचवेळी आक्षेप घेतला होता. आता, पुन्हा एकदा समता पार्टीने यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे म्हटले.