“२०२४ पर्यंत POK भारतात आणून दाखवा, अखंड हिंदुस्थानाचे स्वप्न...”; संजय राऊतांचे थेट आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 11:04 PM2023-12-11T23:04:40+5:302023-12-11T23:04:54+5:30
Sanjay Raut Reaction On POK: मोदींनी काश्मिरी पंडितांना गॅरंटी दिली होती. ती पूर्ण करा, अन्यथा तेव्हा खोटे बोललो, हे देशासमोर मान्य करा, अशी टीका संजय राऊतांनी केली.
Sanjay Raut Reaction On POK: जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्य होता, असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्याबरोबरच जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा आणि राज्यात विधानसभा निवडणूक घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत. या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्राला थेट आव्हान दिले आहे.
मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. केंद्रातील मोदी-शाहांचे सरकार आता तिथे निवडणुका घेऊ शकतात. माहिती नाही, ते कधी घेतील. मात्र, २०१४ मध्ये सत्तेत येताना काश्मिरी पंडितांना काश्मीर खोऱ्यात घरवापसीचे आश्वासन दिले होते. मोदी यांनी ही गॅरंटी दिली होती. मोदी प्रत्येक निवडणुकीत काही ना काही गॅरंटी देतात. गॅरंटी कार्ड दाखवतात. मग आता काश्मिरी पंडितांना दिलेल्या गॅरंटीचे काय करणार, अशी विचारणा संजय राऊत यांनी केली.
२०२४ च्या निवडणुकांदरम्यान काश्मिरी पंडितांची घरवापसी होणार का?
२०२४ च्या निवडणुकांदरम्यान काश्मिरी पंडितांची घरवापसी होणार का, त्यांना मतदानाचा हक्क देणार का, असा सवाल करत, त्याशिवाय तेथे निवडणुका होणार नाहीत. याची गॅरंटी मोदीजींना द्यावीच लागेल. अन्यथा काश्मिरी पंडितांना दिलेले आश्वासन हे जुमलेबाजी होती. त्यावेळेस खोटे बोललो, हे देशासमोर मान्य करा. सन २०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात आणू शकत असाल तर आणून दाखवा. तीही तुमची गॅरंटी आहे. अखंड हिंदुस्थानाचे स्वप्न साकार होईल. जम्मू काश्मीरचा सगळा भाग भारतात आणणे, काश्मिरी पंडितांची घरवापसी करणे ही सगळी गॅरंटी तुम्ही दिली होती. ते सगळे घेऊन जनतेसमोर जावे, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सुचनेनुसार निवडणूक घेण्याआधी पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतले तर संपूर्ण काश्मीरमध्ये एकत्रित निवडणक घेता येईल. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो कायम आपला भाग राहील. काश्मीर सोडून गेलेल्या काश्मिरी पंडितांना परत काश्मीरमध्ये आणण्याची गॅरंटी कोण देणार? येणाऱ्या निवडणुकांआधी ते परत येतील याची गँरंटी कोणी देईल का? पंतप्रधान मोदी तरी देतील का? कारण हल्ली गॅरंटीचा काळ आहे. ते सतत गॅरंटी-गॅरंटी म्हणत असतात, अशी टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.