"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 12:55 PM2024-06-16T12:55:07+5:302024-06-16T13:03:45+5:30

लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे.

Thackeray Group MP Sanjay Raut says we will support Chandrababu Naidu candidate for Lok Sabha Speaker | "...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान

"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान

Lok Sabha Speaker:  लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. मात्र लोकसभा अध्यक्षपदावरुन एनडीएमध्ये अद्याप गोंधळ सुरु आहे. भाजपसह मित्रपक्षांनी लोकसभा अध्यक्षपदाची मागणी केली आहे. त्यामुळे हा तिढा अद्याप सुटलेला नाही. तर इंडिया आघाडीनेही अध्यक्षपद एनडीएतील मित्रपक्षांना मिळायला हवे असे मत व्यक्त केलं आहे. दुसरीकडे, आताखासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपचा लोकसभा अध्यक्ष झाल्यास पंतप्रधान मोदी आणि अमित शाह हे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष फोडतील असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. चंद्राबाबू नायडू यांना अध्यक्षपद हवंय आणि त्यांनी उमेदवार दिल्यास आम्ही चर्चा करुन पाठिंबा देऊ असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलंय. तसेच  आम्ही ठरवलं तर लोकसभेत आमचं बहुमत सिद्ध करु शकतो, असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

"लोकसभा अध्यक्षांची निवडणूक ही खूप महत्त्वाची आहे. २०१४ आणि २०१९ सारखी परिस्थिती आता संसदेत नाही. राहुल गांधी म्हणत असतील की आम्ही सरकार केव्हाही पाडू याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. एनडीएचे सरकार स्थिर नाही. आम्ही ऐकलं आहे की चंद्राबाबू नायडू यांनी लोकसभेचे अध्यक्षपद मागितले आहे. जर लोकसभेच्या अध्यक्षपदी एनडीएची व्यक्ती नाही बसली तर सगळ्यात आधी नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे तेलगु देसम पक्ष फोडतील आणि हे काम सुरु केलं आहे. नितीश कुमार, चिराग पासवान यांचा पक्ष फोडून टाकतील. ज्यांचे मीठ खातात त्यांचाच पक्ष फोडून टाकतात हेच त्यांचे काम आहे. आता परिस्थिती बदलली आहे. आम्ही ठरवलं तर लोकसभेत आमचं बहुमत सिद्ध करु शकतो. चंद्राबाबू यांनी उमेदवार उभा केला तर आम्ही चर्चा करुन प्रयत्न करु की त्यांचे मागे उभे राहू," असं संजय राऊत म्हणाले.

"लोकसभेचे अध्यक्ष पद एनडीएच्या घटक पक्षाने मागितले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांना अध्यक्षपद मिळालं नाही तर अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांचा पक्ष फोडून त्याच्या चिरफळ्या करतील. आज ज्यांच्या टेकूवर हे सरकार उभं आहे उद्या त्यांचा लोकसभा अध्यक्ष झाल्यावर चंद्राबाबू यांचा पक्ष फोडतील. आम्ही लोकसभेत आमची ताकद दाखवू. चंद्राबाबूंनी उमेदवार उभा केला तर आम्ही इंडिया आघाडीमध्ये चर्चा करु आणि त्यांना पाठिंबा देऊ," असेही संजय राऊतांनी म्हटलं.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपला २४० जागा मिळाल्या, ज्या बहुमताच्या आकड्यापेक्षा ३२ ने कमी आहेत. त्यानंतर एन चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार लोकसभेच्या १६ आणि १२ जागांसह किंगमेकर म्हणून उदयास आले. आता चंद्राबाबू यांच्याकडून लोकसभेच्या अध्यक्षपदाची मागणी होत आहे. "अध्यक्षपदाचा उमेदवार एनडीएने एकत्रितपणे ठरवावा. एकमत झाल्यानंतर आम्ही तो उमेदवार उभा करू आणि टीडीपीसह सर्व मित्रपक्ष त्याला पाठिंबा देतील," अशी भूमिका चंद्राबाबूंच्या पक्षाने घेतली आहे.
 

Web Title: Thackeray Group MP Sanjay Raut says we will support Chandrababu Naidu candidate for Lok Sabha Speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.