ठाकोर समाजाच्या मुलींवर मोबाईल वापरण्यास बंदी; सापडल्यास 1.5 लाखांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 10:51 AM2019-07-17T10:51:54+5:302019-07-17T10:52:20+5:30
ठाकोर समाजाच्या लोकांनी रविवारी पंचायत ठेवली होती.
खाप पंचायत, जात पंचायतींसारखीच गुजरातच्या ठाकोर समाजाने मनमानी सुरू केली आहे. ठाकोर समाजातील अविवाहित मुलींनी मोबाईल वापरायचा नाही, असे फर्मानच समाजाच्या पंचायतीने सोडले आहे.
ठाकोर समाजाच्या लोकांनी रविवारी पंचायत ठेवली होती. जालोल गावात झालेल्या या पंचायतीमध्ये मुलींनी मोबाईल वापरणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. गावातील लोक पंचायतीच्या नियमांनाच त्यांचे संविधान मानत आहेत. या पंचायतीचे लोक समाजाचे नियम बनवितात. या नव्या नियमानुसार अविवाहित मुलगीने मोबाईल बाळगणे ठाकोर समाजाच्या नियमांचे उल्लंघन करत गुन्हा समजला जाणार आहे.
जर समाजाच्या अविवाहित मुलीकडे मोबाईल आढळला तर तिच्या वडिलांना 1.5 लाख रुपयांचा दंड पंचायतीकडे जमा करावा लागणार आहे. तसेच जर एखादी मुलगी कुटुंबियांच्या परवानगीशिवाय लग्न करत असेल तर त्यालाही गुन्हा मानला जाणार आहे.
जिल्हा पंचायत सदस्याने सांगितले की, पंचायतीने समाजहितामध्ये काही निर्णय घेतले आहेत. विवाहावेळचा अवास्तव खर्च रोखण्यासाठी डिजे, फटाके वाजविण्यावर बंदी आणली आहे. मोबाईल फोन बाळगणे आणि त्यावर दंड आकारण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे, मात्र लागू करण्याचा निर्णय झालेला नाही.