बीसीसीआयमधून ठाकूर, शिर्के आउट

By Admin | Published: January 3, 2017 05:20 AM2017-01-03T05:20:39+5:302017-01-03T05:20:39+5:30

लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निर्णायक आसूड ओढला आणि मंडळाचे

Thakur and Shirke Out from BCCI | बीसीसीआयमधून ठाकूर, शिर्के आउट

बीसीसीआयमधून ठाकूर, शिर्के आउट

googlenewsNext

नवी दिल्ली : लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निर्णायक आसूड ओढला आणि मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर व चिटणीस अजय शिर्के यांची त्या पदांवरून तडकाफडकी हकालपट्टी केली. येत्या १९ जानेवारीस मंडळावर प्रशासक मंडळ नेमले जाईल व हे प्रशासक लोढा समितीच्या देखरेखीखाली मंडळाचा कारभार करेल, असेही आदेश न्यायालयाने दिला.
लोढा समितीच्या शिफारशी मंजूर करून, त्या अंमलात आणण्याचा आदेश न्यायालयाने यंदाच्या १८ जुलै रोजी दिला होता, त्याविरुद्ध केलेली फेरविचार याचिकाही फेटाळली गेली. तरीही बीसीसीआय न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याऐवजी त्यातून पळवाटा शोधत आहे, असा अहवाल लोढा समितीने दिल्यानंतर सरन्यायाधीश न्या. तीर्थ सिंग ठाकूर, न्या. अजय खानविलकर व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा घणाघाती आदेश दिला.
प्रशासक मंडळ नेमले जाईपर्यंत मंडळाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अध्यक्ष म्हणून व संयुक्त सचिव चिटणीस म्हणून हंगामी स्वरूपात काम पाहातील, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.
एवढेच नव्हे, तर न्यायालयाने आधी दिलेल्या आदेशातील पात्रता निकषांत जे बसत नाहीत, असे बीसीसीआय व राज्य क्रिकेट संघटनांचे इतर पदाधिकारी त्यांच्या पदावरून तात्काळ हटविण्यात आल्याचे मानले जावे, असेही न्यायालयाने सांगितले. त्यामुळे वयाची सत्तरी ओलांडलेला, मंत्री अथवा सरकारी नोकरीत असलेला, अन्य क्रिडा संघटनेत पदावर असलेला किंवा बीसीसीआयमध्ये सलग ९ वर्षे पदाधिकारी राहिलेला कोणीही यापुढे भारतीय क्रिकेट मंडळ किंवा राज्य क्रिकेट संघटनेत कोणत्याही पदावर राहू शकणार नाही.
बीसीसीआयचे ठाकूर व शिर्के वगळून इतर जे पदाधिकारी वरील पात्रता निकषांत बसत असतील ते यापुढे पदावर कायम राहतील. त्यांनी लवकरच नेमण्यात येणाऱ्या प्रशासक मंडळाच्या देखरेखीखाली काम करावे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
नेमण्यात येणाऱ्या प्रशासक मंडळाने लोढा समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने दिलेल्या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे काम प्रामुख्याने करावे, असेही खंडपीठाने नमूद केले. हे प्रशासक मंडळ किती सदस्यांचे असेल हे न्यायालयाने स्पष्ट केले नाही. मात्र त्यासाठी सचोटीच्या आणि अशा प्रकारच्या संघटनेचे प्रशासन चालविण्याचा अनुभव असलेल्या व्यक्तींची निवड केली जाईल, असे सांगून अशा व्यक्तींची नावे सुचविण्यासाठी खंडपीठाने फली नरिमन आणि गोपाळ सुब्रह्मण्यम या ‘अमायकस क्युरी’ म्हणून नेमलल्या दोन ज्येष्ठ वकिलांना दोन आठवड्यांचा वेळ दिला.
कोट्यवधी भारतीय ज्या क्रिकेट खेळावर जीवापाड प्रेम करतात तो खेळ निकोप भावनेने खेळला जावा आणि त्याचे प्रशासन पारदर्शी, वस्तुनिष्ठ आणि जनभवनांची कदर करणारे असावे यासाठी हे कठोर पाऊल उचलणे गरजेचे आहे, असेही न्यायालयाने नमूद केले.
अशा प्रकारे गेली ७० वर्षे भारतीय क्रिकेटवर हुकुमशाही पद्धतीने अधिराज्य गाजविणाऱ्या बीसीसीआयला अद्दल घडली. आम्ही खासगी संस्था असल्याने आम्हाला कोणी जाब विचारू शकत नाही, अशा मग्रुरीत राहिलेल्या देशातील या सर्वात श्रीमंत क्रिडा संस्थेला अखेर ‘अति तेथे माती’ या म्हणीची विदारक प्रचिती आली.

अनुराग ठाकूर आणखी अडचणीत
अनुराग ठाकूर यांचे केवळ अध्यक्षपदावरून गच्छंतीवर भागले नाही. त्यांनी न्यायालयात शपथेवर असत्यकथन केल्याचा आणि न्यायालयाचा हेतुपुरस्सर अवमान केल्याचा प्रथमदर्शनी निष्कर्षही खंडपीठाने काढला. याबद्दल ‘पर्जुरी’ व ‘कन्टेम्प्ट आॅफ कोर्ट’ची कारवाई करून शिक्षा का करू नये, याची नोटीसही त्यांना काढली.

माझी लढाई स्वत:साठी नव्हती
माझी लढाई स्वत:साठी नव्हती. क्रीडा संस्थांच्या स्वायत्ततेसाठी ती लढाई होती. इतर नागरिकांप्रमाणेच मलाही सर्वोच्च न्यायालयाविषयी आदर आहे. निवृत्त न्यायाधीश बीसीसीआयचा कारभार अधिक चांगला चालवू शकतील, असे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना वाटते. माझ्या त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय क्रिकेटचे भले होईल, याची मला खात्री आहे. भारतीय क्रिकेटच्या भल्यासाठी व क्रिडा संस्थांच्या स्वायत्ततेसाठी माझी प्रतिबद्धता (यापुढेही) कायम राहील. - अनुराग ठाकूर, पदच्युत अध्यक्ष, बीसीसीआय

यापूर्वी ही मी अनेक वेळा राजीनामा दिला होता. जागा रिकामी होती व बिनविरोध निवड झाली, म्हणून मी बीसीसीआयमध्ये आलो. मला त्या पदात व्यक्तिगत स्वारस्य नाही. लोढा समितीच्या शिफारशी लागू न केल्याचा ठपका पदाधिकाऱ्यांना देण्यात अर्थ नाही. बीसीसीआयचा कारभार सदस्यांच्या मतानुसार चालतो.- अजय शिर्के,
पदच्युत चिटणीस, बीसीसीआय

हा क्रिकेटचा विजय आहे. प्रशासक येतात आणि जातात. अखेर हे सर्व क्रिकेट खेळाच्या फायद्यासाठीच आहे.
- न्या. आर. एम. लोढा,
समितीचे प्रमुख

भारतीय क्रिकेटची वाटचाल सुरू राहायला हवी. आंध्र प्रदेश क्रिकेट संघटनेत लोढांच्या शिफारशी अंमलात आणू.
- गोका राजू गंगा राजू, कार्यवाहक अध्यक्ष,
बीसीसीआय

Web Title: Thakur and Shirke Out from BCCI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.