आम्हाला अभिनंदनसारखं व्हायचंय; लष्करात दाखल होण्यासाठी लोटले २००० काश्मिरी तरुण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 02:47 PM2019-03-09T14:47:28+5:302019-03-09T14:53:02+5:30
भारतावर मनापासून प्रेम करणारेही हजारो काश्मिरी आहेत आणि ते देशरक्षणासाठीही सज्ज आहेत.
भारताने पाकिस्तानवर केलेला एअर स्ट्राईक, विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी दाखवलेलं शौर्य आणि एकूणच भारतीय लष्कराचा 'जोश' याचे सकारात्मक परिणाम जम्मू-काश्मीरमध्ये पाहायला मिळत आहेत. ज्या खोऱ्यात प्रामुख्याने भारतविरोधी कारवाया पाहायला मिळतात, तिथे देशप्रेमाचा सूर ऐकू येऊ लागलाय. अभिनंदन वर्धमान हे तर काश्मिरी तरुणांचे आदर्शच झालेत. त्यांच्यासारखा पराक्रम करण्यासाठी आम्हाला लष्करात दाखल व्हायचंय, असं म्हणत दोन हजारांहून अधिक तरुण आज जम्मूतील डोडा स्पोर्ट्स स्टेडियममध्ये सैन्य भरतीसाठी पोहोचले.
देशाची आणि माझ्या कुटुंबाची सेवा करण्यासाठी भारतीय लष्करात सहभागी व्हायची इच्छा मुबस्सीर अली या तरुणानं बोलून दाखवली. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्याबद्दल तरुणाईमध्ये आदराची भावना पाहायला मिळाली. पाकिस्तानच्या छळाला न जुमानता अभिनंदन यांनी ज्या धीरानं, जिद्दीनं परिस्थितीचा सामना केला आणि मायदेशात परतले, त्या धाडसाला तरुणाई सलाम करतेय. त्यांचं शौर्य पाहूनच लष्करात येण्याची प्रेरणा मिळाल्याचं अनेकांनी प्रांजळपणे सांगितलं.
#JammuAndKashmir : Over 2000 youngsters take part in the recruitment rally organized by Indian Army at sports stadium in Doda for recruitment in Territorial Army (TA). pic.twitter.com/PrdFRB1cHp
— ANI (@ANI) March 9, 2019
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर, एका विशिष्ट वर्गामुळे, काश्मिरी जनतेबद्दल देशवासीयांच्या मनात संशयाची भावना आहे. जैश-ए-मोहम्मदनं या आत्मघातकी हल्ल्यासाठी काश्मिरी तरुणाचाच वापर केल्यानं, इथल्या तरुणाईकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. परंतु, भारतावर मनापासून प्रेम करणारेही हजारो काश्मिरी आहेत आणि ते देशरक्षणासाठीही सज्ज आहेत, हेच लष्कर भरतीतील काश्मिरी तरुणांची संख्या पाहून लक्षात येतं. याआधी बारामुल्ला इथेही सैन्य भरतीसाठी हजारो तरुण रांगेत दिसले होते. त्यांच्यातील ही देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवणं ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे.