सुनंदाप्रकरणी थरूर यांना नोटीस नाही
By admin | Published: January 9, 2015 02:08 AM2015-01-09T02:08:27+5:302015-01-09T02:08:27+5:30
सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांचे पती आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांना कुठलीही कायदेशीर नोटीस पाठविण्यात आलेली नाही,
दिल्ली पोलीस आयुक्तांची स्पष्टोक्ती : सर्व पुराव्यांचा तपास, सत्यता तपासली जात आहे
नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांचे पती आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांना कुठलीही कायदेशीर नोटीस पाठविण्यात आलेली नाही, अशी स्पष्टोक्ती दिल्लीचे पोलीस आयुक्त बी़एस़ बस्सी यांनी गुरुवारी येथे दिली़
थरूर यांनी पत्नीच्या मृत्यूप्रकरणाच्या तपासात सहकार्य करावे, यासाठी दिल्ली पोलिसांनी त्यांना नोटीस पाठविल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते़
या पार्श्वभूमीवर बस्सी यांनी उपरोक्त बाब स्पष्ट केली़ आम्ही थरूर यांना सुनंदाप्रकरणी औपचारिक कायदेशीर नोटीस पाठविलेली नाही़ तपासासाठी आवश्यक ती प्रक्रिया पार पाडली जात आहे़ तपास अधिकाऱ्यांना माहिती गोळा करायची असून सर्व पुराव्यांचा तपास आणि त्याची सत्यता तपासली जात आहे, असे ते म्हणाले़ दिल्ली पोलिसांनी सुनंदा मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे़ गतवर्षी १७ जानेवारीला सुनंदा दक्षिण दिल्लीच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळल्या होत्या़ शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
गुरुवयूर (केरळ): काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असतानाच, या प्रकरणावर प्रसिद्धीमाध्यमांना सामोरे जाण्याचे थरूर टाळत आहेत़ तूर्तास गुरुवयूर येथील आयुर्वेदिक केंद्रात ते उपचार घेत आहेत़
थरूर यांच्या प्रतिक्रियेसाठी मीडियाने संबंधित आयुर्वेदिक केंद्राबाहेर ठाण मांडले आहे़ मात्र, गुरुवारी तरी ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलण्याची शक्यता कमीच आहे़
आयुर्वेदिक केंद्राचे अधिकारी पेरुमबयिल मान यांनी सांगितले की, थरूर यांचा १५ दिवसांचा कोर्स शुक्रवारी संपत आहे़ त्यामुळे गुरुवारी प्रसिद्धी माध्यमांशी ते बोलण्याची शक्यता कमी आहे़
केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक साजी कुरूप यांनी सांगितले की, सामान्यत: कोर्स पूर्ण होईपर्यंत केंद्रातील कुठल्याही रुग्णास आगंतुकांशी भेटण्याची वा त्यांच्याशी दीर्घ चर्चेची परवानगी दिली जात नाही़ कोर्स संपल्यानंतर त्यांना काय करायचे, हा निर्णय त्यांचा असेल़ ते उपचारादरम्यान पुस्तक लिहिण्यात मग्न आहेत, असेही त्यांनी सांगितले़