सुनंदाप्रकरणी थरूर यांची लवकरच चौकशी
By admin | Published: January 13, 2015 12:15 AM2015-01-13T00:15:33+5:302015-01-13T00:15:33+5:30
सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांचे पती आणि काँग्रेस खासदार शशी थरुर यांना येत्या काही दिवसांत विशेष तपास पथकाच्या(एसआयटी) चौकशीला सामोरे जावे लागू शकते़
नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांचे पती आणि काँग्रेस खासदार शशी थरुर यांना येत्या काही दिवसांत विशेष तपास पथकाच्या(एसआयटी) चौकशीला सामोरे जावे लागू शकते़
सोमवारी दिल्लीचे पोलीस आयुक्त बी़एस़ बस्सी यांनी ही माहिती दिली़ १७ जानेवारी दिल्लीच्या पंचतारांकित हॉटेलात सुनंदा मृतावस्थेत आढळल्या होत्या़ या हॉटेलमधील पुराव्यांशी छेडछाड केली गेल्याचे वृत्त मीडियाने दिले आहे, याबाबत बस्सी यांना छेडले असता, हे वृत्त निराधार असल्याचे ते म्हणाले़ ते म्हणाले की, थरुर दिल्लीला आले आहेत, हे मला ठाऊक आहे़ आमचा तपास सुरू आहे़ येत्या काही दिवसांत एसआयटी त्यांची चौकशी करू शकते़
पाकिस्तानी पत्रकारा मेहर तरार यांच्या चौकशीची शक्यताही त्यांनी नाकारली नाही़ एसआयटीला आवश्यक वाटल्यास त्यांचीही चौकशी केली जाऊ शकते, असे बस्सी यांनी स्पष्ट केले़ सुनंदा यांच्या विसेरा नमुने अद्याप तपासणीसाठी विदेशात पाठविण्यात आलेले नाही़ काही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे नमुने पाठविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले़
१७ जानेवारी २०१४ रोजी चाणक्यपुरीस्थित लीला पॅलेस या पंचतारांकित हॉटेलच्या खोली क्रमांक ३४५ मध्ये सुनंदा यांचा मृतदेह आढळला होता़ यानंतर त्यांच्या मृत्यूबाबत अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत होते़ पाकिस्तानी महिला पत्रकार मेहर तरार यांच्याशी थरुर यांचे कथित संबंध आणि त्यावरून शशी थरुर आणि सुनंदा यांच्यातील तणाव असा एक या प्रकरणाचा कंगोरा या निमित्ताने समोर आला होता़ सुनंदा यांनी या प्रकरणावरून टिष्ट्वटरवर व्यक्त केलेला संताप आणि यानंतर शशी थरुर यांनी सुनंदा यांचे टिष्ट्वटर अकाऊंट हॅक झाल्याचा दावा केला, असे हे प्रकरण गाजले होते़ विशेष म्हणजे यापश्चात शशी थरुर आणि सुनंदा यांनी आम्ही आनंदाने एकत्र नांदत असल्याचे संयुक्त पत्र सोशल नेटवर्किंग साईटवर टाकून हा विषय इथेच संपल्याचे जाहीर केले होते़ यानंतर काही दिवसात सुनंदा यांचा मृतदेह आढळून आला होता़ मात्र त्यांची आत्महत्या की हत्या, हे स्पष्ट होऊ शकले नव्हते़
(लोकमत न्यूज नेटवर्क)