...त्या 'बाळा'ची केली बालसुधारगृहात रवानगी, आरोपीच्या वकिलांनी खटल्याबाबत केला मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 10:26 PM2024-05-22T22:26:47+5:302024-05-22T22:28:19+5:30
Pune Car Accident : पुण्यातील अपघात प्रकरणी आज बाल हक्क न्यायालयाने या अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, कोर्टाच्या निर्णयानंतर त्या अल्पवयीन मुलाचे वकील प्रशांत पाटील यांनी खटल्याबाबत महत्त्वपूर्ण दावा केला आहे.
पुण्यातील कल्याणीनगर येथे बड्या उद्योगपतीच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवून केलेल्या अपघातात तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या प्रकरणाची सध्या देशभरात चर्चा सुरू असून, आज बाल हक्क न्यायालयाने या अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, कोर्टाच्या निर्णयानंतर त्या अल्पवयीन मुलाचे वकील प्रशांत पाटील यांनी खटल्याबाबत महत्त्वपूर्ण दावा केला आहे.
प्रशांत पाटील म्हणाले की, आज तीन न्यायाधिशांच्या समोर सुनावणी झाली. सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी कल्याणीनगरमधे झालेल्या अपघातानंतर या मुलाबाबत समाजात रोष असल्याने त्याला इजा पोहचू शकते. त्यामुळे बाहेर रहाणे या मुलासाठी धोकादायक ठरू शकते, असं मत मांडलं. त्यानंतर या अल्पवयीन मुलाला ५ जूनपर्यंत बाल निरिक्षण गृहात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिला आहे.
प्रशांत पाटील म्हणाले की, या मुलावर तो सज्ञान म्हणून खटला चालवायचा की नाही हे पोलीस तपासात काय समोर येईल, त्या आधारावर ठरेल. २ किंवा ३ महिन्यांत जेव्हा पोलिसांचा तपास पूर्ण होईल, त्यानंतर पोलीस न्यायालयासमोर बाजू मांडतील. त्यानंतर न्यायालय या मुलावर सज्ञान म्हणून खटला चालवायचा की नाही हे ठरवेल, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच हा मुलगा बाल निरिक्षण गृहात असताना पोलीस त्याची चौकशी करू शकणार नाहीत, कारण अशी कायद्यात तरतूद नाही, असेही त्यांनी पुढे सांगितले.
दरम्यान, अल्पवयीन मुलाला जामीन देताना बाल न्याय मंडळाने त्याला पंधरा दिवस येरवडा विभागातील ट्रॅफिक कॉन्स्टेबलसोबत वाहतुकीचे नियोजन करावे. अपघातावर त्याने निबंध लिहावा या अटी, शर्तीवर जामीन दिला. त्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांची बैठकही घेतली होती. त्यानंतर पोलिसांकडून पुन्हा बाल हक्क न्यायालयात अपिल करण्यात आली. त्यावर बाल हक्क न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. पुणे अपघातप्रकरणी विशाल अग्रवाल यांच्या मुलाला बालसुधारगृहात ठेवणार असल्याचे कोर्टाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्या सुधारगृहात तो सज्ञान कि अज्ञान हे ठरणार आहे.