गुजरात सरकारविरोधात ‘ते’ स्टिंग राजकीय हेतूने; दंगल पूर्वनियोजित हा आरोपही खोटा - अमित शहा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 09:34 AM2022-06-26T09:34:43+5:302022-06-26T09:35:26+5:30
गुजरात दंगलीप्रकरणी पंतप्रधान मोदी व अन्य लोकांना क्लीन चिट देणारा एसआयटीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला.
नवी दिल्ली : गुजरातमध्ये २००२ साली दंगे झाले, ही वस्तुस्थिती कोणीही नाकारत नाही. मात्र, या दंग्यांच्या निमित्ताने गुजरात सरकारविरोधात राजकीय हेतूने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधील निष्कर्ष मान्य करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. अनेक खोटेनाटे पुरावे मोदी, गुजरात सरकारविरोधात उभे करण्यात आल्याचे न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट झाले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.
गुजरात दंगलीप्रकरणी पंतप्रधान मोदी व अन्य लोकांना क्लीन चिट देणारा एसआयटीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. त्या निर्णयानंतर अमित शहा यांनी एका मुलाखतीत सांगितले की, गुजरातमध्ये गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेली जातीय दंगल पूर्वनियोजित होती, त्यात गुजरात सरकार, नरेंद्र मोदी यांचा हात होता, असे खोटेनाटे आरोप झाले होते.
ते म्हणाले की, देशात अनेक ठिकाणी दंगे झाले आहेत. काँग्रेस व भाजप सरकारच्या कोणत्याही पाच वर्षांच्या कार्यकाळाची तुलना करून बघा, सर्वाधिक दंगे कोणत्या पक्षाच्या राजवटीत झाले आहेत, याचा नीट उलगडा होईल. गुजरातमधील दंगलींचे मूळ कारण रेल्वेगाडी पेटवून देण्याच्या एका घटनेत होते.
त्या हत्याकांडात ६० लोकांना व आपल्या आईच्या कुशीत बसलेल्या १६ दिवसांच्या अर्भकालाही निर्घृण पद्धतीने जिवंत जाळण्यात आले होते. त्या घटनेत मरण पावलेल्यांपैकी काही जणांचे मी स्वत: अंत्यसंस्कार केले होते. गोध्रा हत्याकांडाचा सर्वात प्रथम भाजपने निषेध केला होता. विरोधी पक्ष मूग गिळून गप्प होते.
‘शीख विरोधी दंगलीच्या चौकशीसाठी एसआयटी आम्ही स्थापन केली’
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, दिल्लीमध्ये शीखांच्या विरोधात दंगल झाली. त्यावेळी तीन दिवस ही दंगल रोखण्यासाठी लष्कर किंवा कोणत्याही सुरक्षा दलाला बोलाविले नव्हते. या दंगलीची चौकशी करण्यास एकही एसआयटी स्थापन करण्यात आली नव्हती. भाजपचे केंद्रात सरकार आल्यानंतर ही एसआयटी नेमण्यात आली. आम्ही आरोपींना अटक केली.
खोटेपणाचा बुरखा फाडायलाच हवा
अमित शहा म्हणाले की, गुजरात दंगलीबाबत राज्यातील तत्कालीन मोदी सरकारवर केलेल्या खोट्या आरोपांविरोधात आम्ही प्रदीर्घ न्यायालयीन लढा दिला. खोटेपणाचा बुरखा फाडणे आवश्यक असते. दंगली घडविण्यामध्ये कोणताही सहभाग नसल्याची क्लीन चिट सर्वोच्च न्यायालयाने दिली. मुसलमानांच्या मताविना भाजप सरकार बनवू शकतो असा आरोप होत असतो. त्याबाबत अमित शहा म्हणाले की, देशात गुजरात मॉडेल म्हणून काही गोष्टी निश्चितच अस्तित्वात आल्या आहेत. आम्ही राज्यात २४ तास वीज सर्वांना उपलब्ध करून दिली. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गळतीचे थांबविली.