समलिंगींच्या विवाहावरील निकाल हा ‘विवेकबुद्धी व संविधाना’चे मत: CJI धनंजय चंद्रचूड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 05:41 AM2023-10-25T05:41:02+5:302023-10-25T05:41:41+5:30
निकालावर अजूनही ठाम
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : समलिंगींच्या विवाहावरील दिलेला निकाल हा ‘विवेकबुद्धीचे आणि संविधानाचे मत’ असल्याचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले आहे. त्यावेळी जे बोललो त्यावर अजूनही ठाम असल्याचेही ते म्हणाले.
जॉर्जटाऊन विद्यापीठ, वॉशिंग्टन आणि लोकशाही हक्क समिती, नवी दिल्लीतर्फे आयोजित ‘भारत आणि अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयांचे दृष्टिकोन’ या विषयावरील चर्चेत सरन्यायाधीश चंद्रचूड बोलत होते.
अल्पसंख्याक निर्णयाचा भाग
न्या. चंद्रचूड यांनी समलिंगींना लग्न करण्यास वा मुले दत्तक घेण्यास परवानगी देण्यासाठी परवानगी दिली होती, मात्र घटनापीठातील अन्य तीन न्यायमूर्तींनी त्याविरुद्ध निर्णय दिला. त्यामुळे मी अल्पसंख्याक निर्णयाचा भाग होतो, असेही ते म्हणाले.
मुद्दा विवाहापुरता मर्यादित नव्हता...
हा मुद्दा केवळ विवाहापुरता मर्यादित नव्हता, तर दत्तक, वारसा, उत्तराधिकार आणि कर यासारखे मुद्दे त्यात होते, असे ते म्हणाले.
तो अधिकार संसदेचा
समलैंगिक समुदायातील लोकांना समान संधी देण्याबाबत आपण बरीच प्रगती केली आहे; परंतु विवाहाचा कायदा करण्याचा अधिकार संसदेच्या कक्षेत येतो, असे चंद्रचूड म्हणाले.