Video झाला व्हायरल! ९ वीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाला चक्क झाडाला बांधून मारले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 10:46 PM2022-08-31T22:46:47+5:302022-08-31T22:48:35+5:30
दुमका येथील सरकारी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना येथील शिक्षकाने प्रॅक्टीकल परीक्षेत जाणीवपूर्वक कमी गुण दिले, त्यामुळे, विद्यार्थी परीक्षेत नापास झाले
रांची - झारखंड राज्यात शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नाराजीची एक विलक्षण घटना समोर आली आहे. दुमका येथील एका सरकारी शाळेतील विद्यार्थ्याने शिक्षकाला झाडाला बांधून मारहाण केल्याचा प्रकार येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी, मुख्याध्यापकांसह 11 विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या विद्यार्थ्याला कमी मार्क देण्यात आले होते, असा आरोप त्याने केला आहे. त्यातूनच त्याने शिक्षकासह शाळेतील स्टाफलाही झाडाला बांधून मारहाण केली. संबंधित विद्यार्थी हा इयत्ता ९ वीत शिकत आहे.
दुमका येथील सरकारी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना येथील शिक्षकाने प्रॅक्टीकल परीक्षेत जाणीवपूर्वक कमी गुण दिले, त्यामुळे, विद्यार्थी परीक्षेत नापास झाले. त्यातूनच, मनात राग ठेऊन संतापलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकासह सहकारी स्टाफला झाडाला बांधून मारहाण केली. शिक्षक कुमार सुमन यांना किरकोळ जखम झाली आहे. या विद्यार्थ्यांनी बैठक करण्याचं सांगत शिक्षकासह स्टाफला बोलावून घेतलं होतं. मात्र, चर्चेवेळी त्यांनी प्रॅक्टीकल परीक्षेत कमी मार्क दिल्याचं कारण पुढे केलं.
दरम्यान, याप्रकरणी स्थानिक प्रशासनाने दखल घेतली असून विद्यार्थ्यांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्नही केला. शिक्षणाधिकारी यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच, आम्ही सर्वच शिक्षकांशी चर्चा केली. तर, विद्यार्थ्यांशी चर्चावेळी, प्रॅक्टीकल परीक्षेत कमी मार्क दिल्याचं कारण त्यांनी सांगितलं. तसेच, शिक्षक आमची बाजू ऐकूनच घेत नसल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला.
२६ ऑगस्ट रोजी इयत्ता ९ वी चा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये, वर्गातील ११ विद्यार्थी नापास झाले. त्यामुळेच, या विद्यार्थ्यांनी ग्रुप बवून शिक्षक कुमार सुमन आणि क्लर्क सोनेराम यांच्याकडे धाव घेतली. तसेच, प्रॅक्टीकल परीक्षेतील मार्क कमी असल्याचे सांगत पेपर दाखविण्याची मागणी केली होती. मात्र, स्टाफने ही मागणी मान्य न केल्यामुळे या विद्यार्थ्यांनी हे पाऊल उचलले.