महादेव ॲपचा मालक रवी उप्पल जेरबंद; लवकरच भारताच्या स्वाधीन केले जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 05:27 AM2023-12-14T05:27:14+5:302023-12-14T05:28:15+5:30
महादेव सट्टेबाजी प्रकरणातील आरोपी व ॲपचा मालक रवी उप्पल याला दुबईत बुधवारी अटक करण्यात आली.
नवी दिल्ली : महादेव सट्टेबाजी प्रकरणातील आरोपी व ॲपचा मालक रवी उप्पल याला दुबईत बुधवारी अटक करण्यात आली. लवकरच त्याला भारताच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. या अटकेमुळे भारतीय तपास यंत्रणा या प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर याच्या आणखी जवळ पोहोचली आहे.
रवी उप्पल हाच सौरभ चंद्राकरचा उजवा हात मानला जातो. तोच सुमारे सहा हजार कोटींच्या घोटाळ्याचा कथित मास्टरमाइंड आहे. रवी उप्पलविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. रवीचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यासाठी तयार असल्याची माहिती दुबई पोलिसांनी दिली. ईडीने रायपूरच्या विशेष कोर्टाकडून या दोघांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट घेतले होते. कथित सट्टेबाजी घोटाळ्याच्या अनुषंगाने मुंबई व छत्तीसगड पोलिस तपास करीत आहेत.
४१७ कोटींची मालमत्ता जप्त
या तपासात ईडीच्या रडारवर बॉलीवूडमधील अनेक मोठे कलाकारही आहेत. ईडीने या प्रकरणी आतापर्यंत देशातील विविध शहरांमध्ये छापेमारीची कारवाई करून ४१७ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचेही नाव या प्रकरणात पुढे आले होते.