भेसळ करणाऱ्यांना आता लागेल २५ हजारांचा दंड?; संसद समितीने केली शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 10:09 AM2023-11-16T10:09:58+5:302023-11-16T10:12:05+5:30
भेसळीमुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका असल्याने शिक्षेमध्ये वाढीचा प्रस्ताव समितीने दिला आहे.
नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात ग्राहकांकडून जोरदार मागणी वाढत असल्याने मिठाई तसेच अन्य खाद्यपदार्थांत मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. यात बनावट किंवा हलक्या दर्जाचा कच्चा माल तसेच कृत्रिम रंगांचा वापर केला जात असतो. यापासून सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका असल्याने अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर कमीत कमी सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि २५ हजारांचा दंड ठोठावण्याची शिफारस संसद समितीने केली आहे. भाजपचे खासदार बृजलाल हे या संसदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. भेसळीमुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका असल्याने शिक्षेमध्ये वाढीचा प्रस्ताव समितीने दिला आहे. (वृत्तसंस्था)
सध्या १ हजारांचा दंड
खाद्यपदार्थांमध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ करण्यासाठी सध्या सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि एक हजार रुपयांचा दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा दिली जाते. ही शिक्षा तसेच दंडाची रक्कम वाढवण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. या प्रकारांना पायबंद बसावा यासाठी कायदे अधिक कठोर करण्याची मागणी होत होती.